|
अण्णासाहेब देशमुख... डोंगरावरचा हा प्रतिभावंत माणूस काळाच्या
पडद्याआड गेला असला तरी अक्षर संचिताचं मौल्यवान धन मागे ठेऊन
गेला आहे. अम्रुतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये
शेवटच्या वर्षाला असताना मी अण्णासाहेब देशमुखांचे 'गोधडी' हे
आत्मचरित्र वाचले आणि मला त्यांच्या आयुष्यातील संघर्षाची
जाणीव झाली. योगायोगाने महाविद्यालयातील वाकचौरे
सरांमुळे मला अण्णासाहेबांना व्यक्तिश: भेटण्याची संधी मिळाली.
अत्यंत साधी रहानीमान असलेल्या त्या व्यक्तीने मला पहिल्या
भेटीतच जिंकून घेतले. 'लोकमत' दैनिकातील त्यांच्याविषयीचा
वाचनीय लेख आपल्या सर्वांनाच प्रेरणादायी राहील..!!.
|
डोंगरावरचा माणूस
उंचखडक नावाच्या गावात आता अण्णासाहेब भेटणार नाहीत, याची रुखरुख कायम
राहणार आहे. आर्थिक, सामाजिक परिस्थितीबरोबरच भौगोलिक परिस्थितीचाही
माणसाच्या स्वभावावर संकर होत असतो. म्हणूनच डोंगरदऱ्यात राहणाऱ्या
माणसांना पहाडाएवढं विशाल मन लाभतं. त्यांच्या जगण्यात वरकरणी रांगडेपणा
दिसत असला तरी आतून ही माणसं संवेदनशील काळजाची असतात. परागकणांना इजा
न करताही फ़ुलपाखरांनी त्यातील मकरंद हळुवारपणे टिपावा इतकी विलक्षण
नाजुकताही त्यांच्या ठायी असते. अण्णासाहेब देशमुख असेच होते. राकट,
कणखर आणि हळवे. साहित्याच्या प्रांतात डोंगराएवढी प्रतिभा लाभलेला हा
माणूस प्रसिध्दीपराड्मुखतेमुळे कायम डोंगराआडच राहिला. 'डोंगराने कात
टाकली' या त्यांच्या कादंबरीने साहित्यात मोलाची भर घातली; मात्र
साहित्यशारदेच्या मंदिरातील तथाकथित सारंस्वतांनी उपेक्षेने त्यांची 'फ़रफ़ट'च
केली. अण्णासाहेब हाडाचे कार्यकर्ते होते. त्यामुळे आयुष्यभर त्यांनी
कधीच सभारंभी उत्सवात स्वत:ला मिरवून घेतले नाही की पुरस्कारासाठी
मांडवली केली नाही.
उंचखडक गावाचे देशमुख घराणे हे तसे नावालाच देशमुख. घरात अठराविश्व
दारिद्र. ज्या वयात कौतुकाचे लाडु खायचे तिथे कष्टाची भाकरी खाण्याचे
बालकडु मिळाल्यामुळे श्रमाची किंमत त्यांना कळली होती. म्हणूनच
आयुष्यभर काबाडांच्या धन्यासाठी ते राबले. परिस्थितीमुळे सहाव्या
इयत्तेनंतर शाळेची पायरी त्यांना कधीच चढता आली नाही; मात्र जन्मजात
लाभलेल्या प्रतिभेमुळे साहित्याचा डोंगरमाथा त्यांनी लीलया सर केला.
साहित्य क्षेत्रातील त्यांची मुशाफ़िरी पाहिली तर हा माणुस खरंच किती
प्रतिभावंत होता, याची प्रचिती येते. ऎन तारुण्यात असताना राष्ट्रसेवा
दलाचं वारं त्यांच्या अंगात शिरलं आणि त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या
चळवळीत स्वत:ला झोकून दिले. अण्णाभाऊ साठे, निळू फ़ुले, दादा कोंडके
यांच्या कलापथकात शिरुन परिर्वतनाची तुतारी फ़ुंकली. मुंबईत पोटासाठी
'मी तो हमाल भार वाही' करत असतानाच ते समाजवादी चळवळीत ओढले गेले. एस.
एम. जोशी, नानासाहेब गोरे याची साथ लाभल्यामुळे त्यांच्या प्रतिभेचा
वारु चौफ़ेर उधळला. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीपासुन खांद्यावर
घेतलेली परीर्वतनाची कावड त्यांनी कधीच खाली ठेवली नाही. गोवा मुक्ती
संग्राम असो की, सीमाप्रश्न. बिन्नीच्या शिलेदाराप्रमाने ते अग्रभागी
उभे राहिले. मुळातच कष्टाचा पिंड लाभल्यामुळे चळवळीत काम करताना नाना
प्रकारच्या अणुभवांना ते सामोरी गेले.
अण्णासाहेब स्वभावाने तसे मिश्किल. कलापथकात काम केल्यामुळे आपले म्हणणे
पटवून देण्यात ते वस्ताद. बोलता-बोलता ते समोरच्याची कधी फ़िरकी घेत ते
कळत नसे. 'आम्ही काय डोंगरावरचे देशमुख, न गाव ना गढी !' त्यांचे हे
परवलीचे वाक्य. सामाजिक, राजकीय, सहकार आणि साहित्यक्षेत्रात त्यांचा
चौफ़ेर संचार होता. अकोले येथे सहकारी साखर कारखाना उभारणीत त्यांचे
मोलाचे योगदान होते. आदिवासी पाड्यावरच्या मुलांना शिक्षणाची सोय व्हावी
म्हणून त्यांनी महाविद्यालय काढले. चळवळीतील कार्यकर्त्यांसाठी तर ते
मुक्त विद्यापीठच होते. 'डोंगराने कात टाकली', 'हाणसावळ्या', 'फ़रफ़ट' या
कादंबऱ्यांत त्यांनी अस्सल ग्रामीन जीवन चितारलं आहे. 'गोधडी' या
आत्मचरित्रात आयुष्यात केलेल्या संघर्षाचा पट त्यांनी विलक्षण ताकतीने
मांडला आहे. 'गोधडी' चा प्रत्येक पदर एका नव्या अनुभवाची वीण उलगडून
दाखवतो. ठायीठायी संघर्षाची गाठ असली तरी अनुभवांची सुई आणि अक्षरांच्या
धाग्यांनी शिवलेली ही 'गोधडी' पश्मी शालीहून उबदार आहे !
डोंगरावरचा हा प्रतिभावंत माणूस काळाच्या पडद्याआड गेला असला तरी अक्षर
संचिताचं मौल्यवान धन मागे ठेऊन गेला आहे. आयुष्यभर ज्यांची सन्मान,
पुरस्कारांच्या बाबतीत उपेक्षाच झाली त्या अण्णासाहेबांच्या नावे
पुरोगामी विचारांच्या मंडळींनी अकोल्यात किमान एखादी व्याख्यानमाला
चालवावी, हीच त्यांना खरी श्रध्दांजली ठरेल.
-नंदकिशोर पाटील,
दै. लोकमत, मंगळवार,
दि. १० जुलै २००७.
|