|
पुणे विद्यापिठामध्ये प्रथम आल्याबद्दल मला मिळालेले सुवर्णपदक असो,
की आय.आय.टी. कानपुर किंवा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या
महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परिक्षेतील माझे यश असो, आदरणीय
दादांनी नेहमीच माझ्या पाठीवर हात ठेऊन मला समोर वाटचाल चालण्याची
प्रेरणा दिली. अशा दादांच्या स्मृती प्रित्यर्थ दोन शब्द... |
एखादी
व्यक्तीच जेव्हा संस्था बनून काम करते, तेव्हा त्यातून हजारो लोकांना
जगण्याचा आधार मिळतो. सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते भाऊसाहेब थोरात (दादा),
ही अशीच चालतीबोलती संस्था होती. त्यांच्या निधनाने केवळ नगर जिल्ह्याचाच
नव्हे, तर महाराष्ट्रासह देशातील सहकारी चळवळीचा एक आधारवड कोसळला आहे.
लोकनेते यशवंतराव चव्हाण यांनी कृषी आणि औद्योगिक क्रांतीचे जे स्वप्न
पाहिले होते, त्यांतील कृषी क्षेत्राच्या आघाडीवर काम करणारे मोजकेच
निष्ठावान कार्यकर्ते होते.
दादा हे त्यांपैकी एक. सहकाराच्या माध्यमातून शेतीत वेगवेगळे प्रयोग करत
त्यांनी सामान्य शेतकऱ्याला जगण्याचे बळ दिले. संघटित लोकशक्ती कोणत्या
प्रकारचा चमत्कार घडवू शकते, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे त्यांनी
पर्यावरणाच्या संवर्धनासाठी राबविलेली दंडकारण्याची आधुनिक चळवळ. या चळवळीने
लाखो लोकांना जगण्याचा आधार दिला. माणसाच्या नैतिक अधःपतनातून आणि लोभामुळे
पर्यावरणाचा ऱ्हास होतो, असे दादा नेहमी सांगत असत. त्याचा प्रत्यय आज
वारंवार येताना दिसतो. लोकांचे प्रश्न समजावून घेत संयमी वृत्तीने काम करत
राहणे यासाठी जी त्यागी वृत्ती लागते, त्याचा आदर्श वस्तुपाठच दादांनी
आपल्या कामातून घालून दिला. १९४२ च्या स्वातंत्र्यलढ्यात तुरुंगवासात असताना
अण्णासाहेब शिंदे यांच्यासारख्या ऋषितुल्य व्यक्तीच्या सहवासामुळे डाव्या
विचारसरणीचा पगडा त्यांच्या मनावर होता. स्वच्छ आचार आणि विचार असलेला हा
नेता आयुष्यभर शेतकरी, कामगार यांच्या हितासाठीच लढत राहिला.
राजकारणाच्या चिखलात राहूनही दादा निर्लेप आणि निष्कलंक राहिले, हे
त्यांच्या नेतृत्वाचे वैशिष्ट्य! प्रवरा नदीकाठच्या जोर्वे गावात 12
जानेवारी 1924 रोजी जन्मलेल्या दादांनी स्वातंत्र्याच्या चळवळीत उडी घेतली.
तुरुंगात असतानाच माजी कृषिमंत्री अण्णासाहेब शिंदे यांच्या सहवासात ते
मार्क्सवादी झाले. तुरुंगातून सुटल्यावर अहमदनगर जिल्ह्यात त्यांनी शेतकरी
आणि श्रमिकांचे संघटन करुन हक्कासाठी लढेही दिले. कम्युनिस्ट
विचारप्रणालीच्या मर्यादा लक्षात आल्यावर, त्यांनी कॉंग्रेस पक्षाच्या
राजकारणात झोकून दिले. संगमनेर आणि परिसराचा विकास घडवायसाठी गावच्या
सोसायटीच्या अध्यक्षपदापासून त्यांनी सहकारी चळवळीत स्वत:ला झोकून दिले.
सहकारी चळवळ ही लोकांच्या सेवेसाठी आणि लोकांच्या विश्वासावरच चालली पाहिजे,
असा त्यांचा आग्रह होता. नगर जिल्हा बॅंकेचे सतरा वर्षे ते अध्यक्ष होते.
राज्य सहकारी बॅंकेचेही अध्यक्ष होते. संगमनेर सहकारी साखर कारखाना सुरु
करून त्यांनी, परिसराच्या विकासाचा पाया घातला. हा कारखाना अत्यंत
कार्यक्षमपणे चालवून, नवा आदर्शही निर्माण केला. जिल्ह्यातील सहकारी साखर
कारखान्यात उसाला सर्वाधिक दर देणारा कारखाना, असा लौकिकही मिळवला. काही
काळ ते विधानसभेचे सदस्यही होते.
वयाच्या साठीनंतर दादांनी संगमनेर आणि परिसराचा कायापालट घडवायसाठी विविध
विकास योजनांना गती दिली. समर्पित वृत्तीने ते सक्रिय राजकारणात राहिले.
अलिकडे बोकाळलेल्या स्वार्थाच्या राजकारणापासून दादा अलिप्त होते.
उपेक्षितांना आणि वंचितांना सामाजिक न्याय द्यायच्या तत्वापासून ते कधीही
दूर झाले नाहीत. पन्नास वर्षे राजकारणात घालवूनही त्यांचे सार्वजनिक
चारित्र्य निष्कलंक राहिले, त्याचे कारण साने गुरुजींच्या राष्ट्र सेवादलात
त्यांची जडण-घडण झाली होती आणि नीतीमूल्यांचे पालन हे त्यांचे असिधारा व्रत
होते. त्यामुळेच कॉंग्रेसच्या राजकारणात असतानाही त्यांचा मित्र परिवार
कायम राहिला. त्यांचा लोकसंग्रह तर अफाट होता. माणसांच्या सतत गराड्यात
राहणे आणि त्यांच्या समस्या सोडवणे हे त्यांचे दैनंदिन जीवनच झाले होते.
वयाची ऐंशी वर्षे उलटल्यावर, आल्प्स पर्वतात एल झिअर्ड बुफे या एकाच माणसाने
पस्तीस वर्षात निर्माण केलेल्या जंगलाच्या कर्तृत्वाने दादा झपाटले. त्यांनी
श्रीरामांच्या वास्तव्याने पुनित झालेल्या संगमनेर-अकोले भागातील ओसाड
डोंगरावर पुन्हा एकदा दंडकारण्य निर्माण करण्याचा ध्यास घेतला. लोकांना
संघटित करून त्यांनी "ग्रीन आर्मी'ची स्थापना केली. हजारो लोक, महिला आणि
विद्यार्थ्यांना संघटित करुन 2005 मधल्या पावसाळ्यात या भागातल्या 132
गावातल्या माळरानावर एक कोटी झाडांची बियाणे लावली. या लोक चळवळीसाठी
त्यांनी आजारी असतानाही, जनजागरण केले. पुढच्या वर्षी याच भागात चार कोटी
बियाणे पेरले. प्राचीन काळातले दंडकारण्य पुन्हा वास्तवात आणायच्या ध्यासाने
झपाटलेल्या दादांनी संगमनेरच्या भागात पर्यावरण संवर्धनाची नवी आदर्श लोक
चळवळ उभी करुन ती यशस्वीही केली. लोकांनी लोकांच्यातर्फे चालवलेली चळवळ,
असेच या वननिर्मितीचे ध्येय असले पाहिजे, यावर त्यांचा कटाक्ष होता. गाणी,
भाषणे, पोवाडे अशा विविध मार्गाने त्यांनी या वनासाठीचा लोकजागर सतत सुरूच
ठेवला. तीन वर्षांनी या ओसाड आणि वैराण माळरानावर, डोंगरावर लाखो झाडे
डुलायला लागली. हा परिसर हिरवागार झाला. संघटित लोकशक्तीद्वारे पर्यावरण
रक्षणाचा नवा चमत्कार दादांनी घडवून दाखवला. त्यांच्या निधनाने दंडकारण्य
चळवळीचा प्रणेता हरपला आहे. हे आधुनिक दंडकारण्य दादांच्या पर्यावरण
रक्षणाची प्रेरणा देशवासियांना सदैव देत राहील. 84 वर्षांचा एक वृध्द युवा
लोकशक्तीच्या बळावर साडेचार कोटी झाडे लावू शकतो, ही अद्भूत घटना वास्तवात
आणणारा हा आधुनिक दंडकारण्याची निर्मिती करणारा, वनऋषी होता.
संगमनेर तालुक्याच्या गावागावांत दूध, फळे, भाजीपाला यांच्यासाठी सहकारी
सोसायट्यांचे जाळे निर्माण करण्याचा द्रष्टेपणा त्यांच्यात होता. जोडधंदा
केल्याशिवाय शेतकरी जगू शकणार नाही, याचे मर्म त्यांनी जाणले होते.
त्यातूनच दूध संस्थांचेएक भक्कम जाळे त्यांनी उभे केले. सावकारशाहीच्या
पाशात अडकलेल्या दुबळ्या माणसाला ताकद देऊन पुन्हा उभे करण्याचे असिधारा
व्रत त्यांनी अंगीकारले होते. "अमृतमंथन' या त्यांच्या आत्मचरित्रात याचा
प्रत्यय येतो.
वास्तवातील आव्हानांना सामोरे जाण्याची जबरदस्त ताकद दादांमध्ये होती. अथक
परिश्रमांचा ध्यास, जिद्द, व्यावहारिक शहाणपण आणि ध्येयनिष्ठा या गुणांमुळे
ही ताकद त्यांच्यात होती. जनमानसातील अढळ स्थान हीच त्यांची संपत्ती होती.
राजकारण म्हणजे केवळ सत्ताप्राप्ती आणि सत्तेतून अर्थप्राप्ती या समजुतीला
छेद देणारे मूलभूत काम ज्यांनी केले, त्यात दादांचे नाव अग्रभागी राहील.
कष्टांतून सुबत्ता आणि सुबत्तेतून समृद्धीची गंगा संगमनेर तालुक्याच्या
प्रत्येक घरात त्यांनी पोचविली. त्यांनी केलेले काम सहकार आणि राजकारणात
येणाऱ्या नव्या कार्यकर्त्यांना प्रेरणा देत राहील. |