Right to Information

 

माहितीचा अधिकार अधिनियम - 2005”– दिनांक 12 ऑक्टोबर, 2005 पासून जम्मू व काश्मीर राज्य वगळता देशभर लागू झालेला आहे.
संपूर्ण अधिनियम वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
“माहितीचा अधिकार अधिनियम - 2005” च्या अंमलबजावणी साठी ‘महाराष्ट्र माहिती अधिकार नियम – 2005’, दिनांक 12 ऑक्टोबर, 2005 पासून अंमलात आलेले आहेत.
संपूर्ण नियम वाचण्यासाठी येथे क्लिक करा
माहितीचा अधिकार अधिनियम - 2005” च्या तरतुदींच्या अधिन राहून तुम्हांला माहिती मागण्याचा अधिकार प्राप्त झालेला आहे.
महाराष्ट्र माहिती अधिकार अधिनियम – 2002 रद्दबातल झालेला आहे.
माहिती म्हणजे
कोणत्याही स्वरूपातील कोणतेही साहित्य असा असून त्यामध्ये, अभिलेख, दस्तऐवज, ज्ञापने, ई-मेल, अभिप्राय, सूचना, प्रसिध्दीपत्रके, परिपत्रके, आदेश, रोजवह्या, संविदा, अहवाल, कागदपत्रे, नमुने, प्रतिमाने (मॉडेल), कोणत्याही इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील आधारसामग्री आणि त्या-त्या वेळी अंमलात असलेल्या अन्य कोणत्याही कायद्यान्वये सार्वजनिक प्राधिकरणास मिळविता येईल अशी कोणत्याही खाजगी निकायाशी संबंधित माहिती होय.
माहितीसाठी विनंती अर्ज
तुम्हांला माहिती हवी असल्यास, तुम्ही माहिती मिळविण्यासाठीचा विनंती अर्ज, संबंधित माहिती अधिका-याकडे साध्या कागदावर जोडपत्र (अ) मध्ये दिलेल्या नमुन्यात करावा.
तुम्हांला इंग्रजी किंवा हिंदी अथवा अर्ज ज्या क्षेत्रात करण्यात येत असेल त्या क्षेत्राच्या राजभाषेत अर्ज करता येईल किंवा इलेक्ट्रॉनिक साधनाद्वारे माहिती मागता येईल.
तुम्हाला, माहिती मागण्याची कारणे द्यावी लागणार नाहीत.
तुम्हाला लेखी स्वरूपात माहिती मागता येत नसेल तर, तुमची मौखिक विनंती लेखी स्वरूपात आणण्यासाठी माहिती अधिकारी तुम्हाला सहाय्य करतील.
तुम्ही ज्ञानेंद्रियांच्या दृष्टीने विकलांग असाल तर, माहिती अधिकारी, माहिती मिळविणे ज्यायोगे शक्य होईल असे सहाय्य देतील, तसेच पाहणी करण्यासाठी उचित असेल असेही सहाय्य देतील.
अर्जासोबतची फी
अर्जासोबत रुपये दहा इतकी अर्ज फी रोख रकमेच्या स्वरूपात, तिची योग्य पावती घेऊन किंवा बॅंकर्स चेकने किंवा डिमांड ड्राफ्टने द्यावयाची आहे. किंवा अर्जावर दहा रुपयांचा कोर्ट फी स्टॅम्प चिकटवावयाचा आहे.
तुम्ही दारिद्र्य रेषेखालील असल्यास व तसा कागदोपत्री पुरावा दिल्यास, तुम्हांला अर्जासोबतची फी देय नाही.
विनंती अर्जावरील कार्यवाही
तुमचा अर्ज प्राप्त झालेच्या दिनांकापासून तीस दिवसांच्या आत माहिती देणे अथवा नाकारणे माहिती अधिका-यावर बंधनकारक आहे.
माहिती देण्यासाठी ज्यादा फी भरण्याबाबत तुम्हांला सूचना पाठविल्यास, सूचना पाठविल्याचा दिनांक व तुम्ही फी भरल्याचा दिनांक या दरम्यानचा कालावधी तीस दिवसांच्या कालावधीची परिगणना करण्याच्या प्रयोजनार्थ, वगळण्यात येईल.
मागितलेली माहिती, एखाद्या व्यक्तिचे जीवित वा स्वातंत्र या संबंधातील असेल तर, विनंतीचा अर्ज मिळाल्यापासून अठ्ठेचाळीस तासांच्या आत अशी माहिती देण्यात येईल.
माहिती नाकारल्यास, ती कारण देऊन नाकारली जाईल.
माहिती मुदतीत दिली नाही तर, ती नाकारली असे होईल.
तुम्हांला विहीत मुदतीत माहिती दिली नाही तर, अशी माहिती तुम्हांला मोफत देण्यात येईल.
तुमचा विनंती अर्ज फेटाळण्यात आला असेल तर, विनंती अर्ज फेटाळण्याची कारणे, अर्ज फेटाळण्याचे विरोधात अर्ज करता येईल तो कालावधी आणि अपील प्राधिकारी यांचा तपशील माहिती अधिकारी तुम्हांला कळवील.
माहिती पुरविण्यासाठी फी आकारणी
तुम्हाला माहिती पुरविण्यासाठी देय असलेली फी, रोख रकमेच्या स्वरूपात, तिची योग्य पावती देवून किंवा बॅंकर्स चेक किंवा डिमांड ड्राफ्ट या स्वरूपात किंवा मनी ऑर्डरच्या स्वरूपात पुढील दरांनी आकारण्यात येईल.
विशिष्ट दस्तऐवज, नकाशे इत्यादींची किंमत अगोदरच निश्चित केली असेल, अशी किंमत अधिक टपाल खर्च.
माहिती छायांकित प्रतींच्या स्वरूपात हवी असल्यास, प्रत्येक पृष्ठासाठी ( ए-४ किंवा ए-३ आकारातील कागद ) दोन रूपये अधिक टपाल खर्च.
डिस्केट किंवा फ्लॉपी स्वरूपातील माहितीसाठी प्रती डिस्केट किंवा फ्लॉपीकरिता पन्नास रूपये अधिक टपाल खर्च.
मुद्रित स्वरूपातील माहिती पुरविण्यासाठी, अशा प्रकाशनासाठी निश्चित केलेली किंमत किंवा त्या प्रकाशनातील उता-यांच्या प्रत्येक छायांकित पृष्ठासाठी दोन रूपये अधिक टपाल खर्च.
( वरील प्रत्येक प्रकरणी अर्जदार व्यक्तिशः येऊन माहिती घेवून जाईल त्याबाबतीत, कोणताही टपाल खर्च आकारण्यात येणार नाही. )
अभिलेख पाहण्यासाठी, पहिल्या तासाकरिता कोणतीही फी नाही, आणि त्यानंतरच्या प्रत्येक पंधरा मिनिटांकरिता ( किंवा त्याच्या भागाकरिता ) रूपये पाच इतकी फी आकारली जाईल.
अपील करण्याची पद्धती
पहिले अपील (अपील प्राधिका-याकडे )
तुम्हांला मुदतीत निर्णय मिळाला नसेल तर किंवा माहिती अधिका-याच्या आदेशामुळे तुम्ही व्यथित झाला असाल तर तुम्हांला संबंधित अपील प्राधिका-याकडे अपील दाखल करता येईल. हे अपील आदेश मिळाल्याच्या दिनांकापासून तीस दिवसांच्या आत साध्या कागदावर जोडपत्र (ब) मध्ये दिलेल्या नमुन्यात दाखल करावे लागेल.
तुम्हांला अपिलासोबत ज्या आदेशाविरूध्द अपील दाखल करावयाचे आहे, त्या आदेशाची एक प्रत द्यावी लागेल.
तसेच, अपिलासोबत वीस रूपये इतकी अपील फी, रोख रकमेच्या स्वरूपात, तिची योग्य पावती घेवून किंवा बॅंकर्स चेक किंवा डिमांड ड्राफ्ट या स्वरूपात द्यावी लागेल किंवा अपिलावर वीस रुपयांचा कोर्ट फी स्टँप चिकटवावा लागेल.
दुसरे अपील ( राज्य माहिती आयोगाकडे )

तुम्ही अपील प्राधिका-याच्या आदेशामुळे व्यथित झाला असाल तर, अपील प्राधिका-याचा आदेश मिळाल्याच्या दिनांकापासून नव्वद दिवसांच्या आत, साध्या कागदावर राज्य माहिती आयोगाकडे       जोडपत्र (क) मध्ये दिलेल्या नमुन्यात तुम्हाला दुसरे अपील दाखल करता येईल.

तुम्हाला अपिलासोबत, ज्या आदेशाविरूध्द अपील दाखल करावयाचे आहे, त्या आदेशाची एक प्रत द्यावी लागेल.
तसेच, अपिलासोबत वीस रूपये इतकी अपील फी, रोख रकमेच्या स्वरूपात, तिची योग्य पावती घेवून किंवा बॅंकर्स चेक किंवा डिमांड ड्राफ्ट या स्वरूपात द्यावी लागेल किंवा अपिलावर वीस रुपयांचा कोर्ट फी स्टँप चिकटवावा लागेल.
माहिती मिळविण्याचा नमुना जोडपत्र - अ
पहिले अपील नमुना जोडपत्र - ब
दुसरे अपील नमुना जोडपत्र - क
 
Water Resources  Civil Engineering Notes  Aamhi Sangamnerkar  Books
© 2006~13 Pravin Kolhe
Page Last Updated on 12-10-2013 07:41:40