|
व्याख्याते: श्री. प्रविण कोल्हे, सहाय्यक
कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग, अमरावती.
प्रमुख पाहुणे : श्री. प्रदिप वानखडे, सचिव, मराठा
सेवा संघ, अमरावती.
मुख्य संयोजक : प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे,
संचालक, डॉ. पंजाबराव देशमुख
IAS
अकादमी, अमरावती.
: श्रीमती ज्योती तोटेवार, सहसंचालिका,
: वैराग्यमुर्ती संत गाडगे महाराज
महोत्सव समिती, अमरावती,
: श्री. संत गाडगे महाराज समाधी मंदिर
ट्रस्ट, अमरावती
प्रास्तविक
किर्तनाद्वारे लोकशिक्षणाचे भरीव कार्य करणारे
वैराग्यमुर्ती संत श्री. गाडगेबाबा यांच्या ५४ व्या
पुण्यतिथी महोत्सवानिमित्त आज याठिकाणी संत गाडगेबाबा
करियर व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफण्याचे भाग्य
मला लाभले, याबद्दल मी स्वत:ला धन्य समजतो. आजच्या या
शुभप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणुन श्री. प्रदिप वानखडे,
सचिव, मराठा सेवा संघ, अमरावती हे लाभलेले आहेत.
त्यांना मी विनम्र अभिवादन करतो, तसेच सर्व श्रोते
वर्गालाही मनपुर्वक नमस्कार करतो. मला या पुण्यभुमीवर
आमंत्रित करुन आपल्याशी सुसंवाद साधण्यासाठी व्यासपीठ
मिळवुन दिल्याबद्दल मी डॉ. पंजाबराव देशमुख IAS
अकादमीचे संचालक प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे, व
सहसंचालिका श्रीमती ज्योती तोटेवार यांचे मन:पुर्वक
आभार व्यक्त करतो. केवळ व्यावसायिक दृष्टीकोन न ठेवता,
सामाजिक बांधिलकीच्या भावनेतुन त्यांनी ग्रामीण
भागातुन व प्रामुख्याने शेतकरी कुटुंबातुन अधिकारी
निर्माण करण्याचे जे प्रेरणादायी काम सुरु केले आहे,
त्याला शुभेच्छा देतो, व या भागातुन अधिकाधिक
विद्यार्थी चांगले अधिकारी बनावेत, ही आशा व्यक्त करतो.
तसेच, वैराग्यमुर्ती संत गाडगे महाराज महोत्सव समिती,
अमरावती व श्री. संत गाडगे महाराज समाधी मंदिर
ट्रस्ट, अमरावती यांचे देखील मी व्याख्यानाच्या
प्रारंभीच आभार व्यक्त करतो.
समाजातील दारिद्र्य नि जातिभेदांमुळं निर्माण होणारी
विषमता, त्याचप्रमाणं अशिक्षितता हेच समाजाच्या
कल्याणातले व प्रगतीतले अडसर आहेत. ते काढून टाकायला
हवेत, या श्री. संत गाडगेमहाराज यांच्या मनातील
विचार-बीजालाच पुढं अंकुर फुटले आणि त्यांनी
कीर्तनाच्या माध्यमातून लोकशिक्षणाच्या कार्यास
प्रारंभ केला. देव दगडात नसून माणसात असतो, यासाठीच
माणूस घडविणं, हेच आपलं ब्रीद असायला हवं, त्यासाठी
शिक्षण घ्यायला हवं, या मताचा पुनरुच्चार त्यांनी
वेळोवेळी केला. कीर्तनाच्या प्रभावी माध्यमातून
माणसाचीच आपण सेवा करायला हवी या बुद्धिप्रामाण्यवादी
विचाराचे सुसंस्कार गाडगेबाबांनी सर्वसामान्यांवर केले.
संत गाडगेबाबा स्वतः निरक्षर होते पण प्रत्येक
‘मुलांनं शिकलं पाहिजे’ हा त्यांचा आग्रह दरवेळी ते
आपल्या रसाळ कीर्तनातून करीत. “माणसाणे एक सांजचे उपाशी
रहावे, बाईने लुगडे फाडून त्याचे दान करावे, पण आपल्या
पोराले अज्ञानी ठेवू नये, त्याले मराठी शाळेमंदी शिकाले
पाठवावं!” असे ते म्हणत. म्हणुनच अशा माणसात देव
शोधणाऱ्या संतांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने
संयोजकांनी ही व्याख्यानमाला आयोजित केली आहे.
संयोजकांचे हे कार्य म्हणजे एक प्रकारे इश्वराचीच भक्ती
केल्यासारखे आहे. अशा कार्यक्रामामध्ये माझ्या त्रोटक
ज्ञानाचा, अनुभवाचा व शिक्षणाचा गरजु
विद्यार्थ्यांकरिता फायदा व्हावा, याच हेतुने मी आज या
ठिकाणी आपल्यासोबत काही गोष्टी share करणार आहे.
महान संत श्री. गाडगेबाबा यांचे पुण्यस्मरण करुन,
त्यांना भावपुर्वक अभिवादब करुन आपण आपल्या या “अभ्यास
कसा करावा” या व्याख्यानाला नव्हे चर्चासत्राला सुरुवात
करुया. आपल्या या व्याख्याना दरम्यान आपण सहा ’क’ ची
उत्तरे शोधणार आहोत. या सहा ’क’ पासुन सुरु होणाऱ्या
प्रश्नांची एकदा का आपण उत्तरे दिलीत की पुढचा प्रवास
अतिशय सोपा होणार आहे. तर हे ’क’ आहेत- “का”, “काय”, “कसा”,
“केव्हा”, “कुठे” आणि “कोण”. चला तर मग, आपण सुरुवात
करुया “का” पासुन...!
१) अभ्यास का करावा? (WHY)
अभ्यास का करावा... मोठा गमतीदार प्रश्न आहे. आज
माझ्यासमोर कष्टकरी शेतकरी व मध्यमवर्गीय समाजातील मुले
जास्त प्रमाणात बसलेली आहेत असे मला वाटते. पुर्वी
आपल्या समाजामध्ये “उत्तम शेती, मध्यम व्यापार व
कनिष्ट नोकरी” असे सुत्र होते. त्यावेळी कमी लोकसंख्या
व निसर्गाचा समतोलपणा यामुळे शेतीतुन चांगले उत्पन्न
मिळत होते. पण बदलते वातावरण,
वाढते शहरीकरण तसेच
त्याही पलिकडे जाऊन, जागतिकीकरणाच्या
प्रभावामुळे शेतीकडे दुर्लक्ष झाले.
परिणामी नोकरी करणाऱ्यांना एक प्रकारचे आर्थिक स्थैर्य
प्राप्त झाले व शेती व्यवसाय बेभरवश्याचा झाला.
त्यामुळे हुशार समजला जाणारा वर्ग
नोकरी/व्यवसाय या क्षेत्राकडे वळला.
माहिती व तंत्रज्ञानाच्या या एकविसाव्या शतकात जगायचे
असेल, तर अभ्यास अपरिहार्य आहे. पुर्वी असाही
(गैर)समज होता
की शैक्षणिक क्षेत्राव्यतिरिक्त इतर क्षेत्रात
अभ्यासाची गरज नसते, पण आज प्रत्येक क्षेत्रात
अभ्यासु व उच्चशिक्षित व्यक्तींची नितांत आवश्यकता आहे. तुम्हाला
शेतकरी जरी व्हायचे असेल, तरी तुम्हाला संगणकाचा
अभ्यास करावाच लागेल. दिवसेंदिवस नवनवीन शोध लागत आहेत,
त्यांच्याशी तुम्हाला up-to-date रहायचे असेल, या जगात
यशस्वी व्हायचे असेल, तर तुम्हाला अभ्यास करावाच लागेल.
केवळ परिक्षेत चांगले मार्क मिळावेत, म्हणुन आपल्याला
अभ्यास करायचा नाही, तर त्या ज्ञानाचा वापर करुन
आपल्याला समाजाच्या भल्यासाठी काहीतरी करायचे आहे, या
भावनेतुन अभ्यास करा. संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे –
“विद्वान सर्वत्र पुज्यते।“ राजाला फक्त त्याच्या
देशातच मान-सन्मान मिळतो, तर विद्वान हा सगळीकडे
पुजनीय असतो असा त्याचा भावार्थ आहे. म्हणुनच आपल्या
आयुष्यामध्ये यशस्वी होण्याचे जे काही विविध मार्ग
आहेत, त्यासाठी अभ्यास महत्वाचा आहे. मात्र जाता जाता
एवढे सांगावेसे वाटते की, केवळ शैक्षणिक गुणवत्ता
म्हणजेच यश नाही. कारण शेवटी यश म्हणजे तरी नेमके काय?
१९८८ साली दहावीच्या परिक्षेत सचिन तेंडुलकर इंग्रजीत
अनुत्तीर्ण झाला व आज २०१० साली दहावीच्या इंग्रजीच्या
पुस्तकात पहिला धडा सचिनचा आहे... यालाच म्हणतात ’यश’.
या चर्चेवरुन आपल्याला अभ्यास का करावा याचा थोडेफार
बोध झाला असावा. आता आपण दुसरा ’क’ म्हणजे “काय”
याबाबत चर्चा करुयात.
२) अभ्यास काय करावा? (WHAT)
अभ्यास म्हणजे केवळ अभ्यासक्रमातील विषयांची
परिक्षेतील मार्कांसाठी केलेली उजळणी अशी संकुचित
वृत्ती ठेवल्यास केलेल्या अभ्यासातुन फलनिष्पत्ती
होणार नाही. त्याकरिता अभ्यासाचे Utilisation म्हणजे
वापर करणे महत्वाचे आहे. तुम्ही ३ इडियट हा अमिर खानचा
सिनेमा नक्कीच पाहिला असेल, त्यामध्ये रॅंचोने कसा
त्याच्या अभ्यासाचा वापर केला...! आजच्या जगात
वर्तमानपत्रातील बातम्या वाचणे, इंटरनेटच्या सहाय्याने
आपल्याला हवी असलेली माहिती शोधणे, संगणकतील विविध
software install करणे, त्याचा वापर करणे, थोर
व्यक्तींची आत्मचरित्रे वाचणे, हा सुध्दा अभ्यास असु
शकतो. आमच्या सारख्या अधिकाऱ्यांना तर समाजातील अडचणी
शोधुन त्यातुन मार्ग काढावा लागतो. म्हणुनच
पाठ्यक्रमातील अभ्यासक्रमाव्यतिरिक्तही अभ्यास असु शकतो,
व तोही तेवढाच महत्वाचा आहे, किंबहुना जास्त महत्वाचा
आहे, हे लक्षात ठेवा. आता अभ्यासक्रमाव्यतिरिक्त कोणता
अभ्यास करावा हे ज्याने-त्याने आपापल्या आवडीनुसार
ठरवावे. एकदा का तुम्ही तुमच्या आवडत्या क्षेत्रात
शिरलात, की तुम्हाला त्याच्या अभ्यासाची धास्ती
वाटणारच नाही. आजच्या या व्याख्यानातुन मी तुम्हाला
पाठ्यक्रमातील अभ्यासाबद्दलच थोड्याफार Tips देणार आहे.
आता आपण तिसऱ्या ’क’ म्हणजे अभ्यास “कसा” करावा या
महत्वाच्या प्रश्नाकडे वळुया.
३) अभ्यास कसा करावा (HOW)
· अभ्यासक्रमाचे चार भागामध्ये Important & Urgent
महत्वाचे व तात्काळ याआधारे विभाजन करणे
सर्वप्रथम तुम्ही तुमच्या अभ्यासक्रमातील प्रत्येक
विषयाची तोंडओळख करुन घ्या. त्यातील महत्वाचे मुद्दे
बघा. तुम्हाला लगेच काही समजले नाही तरी चालेल,
पुर्वीच्या परिक्षेमध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्नांची
नोंद करा. म्हणजे तुम्हाला कोणत्या भागावर परिक्षक
जास्त weight-age देतात, ते लक्षात येइल. त्याच्या
आधारे तुमच्या एकूण अभ्यासक्रमाचे चार भाग पाडा. पहिला
भाग म्हणजे Important & Urgent म्हणजेच, तात्काळ व
महत्वाचे. Urgent किंवा तात्काळ म्हणजे, जर त्या भागाचा
अभ्यास तुम्ही अभ्यास आताच केला नाही, तर, तुम्हाला
पुढे जे काही शिकवले जाणार आहे, ते समजणार नाही,
म्हणुन ते तात्काळ...! Important किंवा महत्वाचे म्हणजे
जे परिक्षेच्या दृष्टीने महत्वाचे आहे असा भाग. या
Urgent & Important भागाच्या अभ्यासासाठी तुम्ही
तुमच्या अभ्यासाचा ५० टक्के वेळ राखुन ठेवा. त्यानंतर
दुसरा भाग आहे, Important, but not Urgent. म्हणजे
परिक्षेला विचारले जाण्याची शक्यता आहे; पण आताच
अभ्यास करण्याची आवश्यकता नाही. हया भागाचा अभ्यास
तुम्ही नंतर कधीही परिक्षेपुर्वी करु शकाल, म्हणुन वेळ
कमी असल्यास त्याचा अभ्यास नंतर करा. तिसरा भाग आहे-
Urgent, but not Important. हा भाग परिक्षेला
विचारण्याची शक्यता खुपच कमी आहे, पण त्याचा अभ्यास
तुम्ही केला नाही तर, तुम्हाला वर्गात पुढे शिकवले
जाईल ते समजणार नाही, म्हणुन या भागाचा अभ्यास लगेच करा.
पहिला भागाला आपण ५० टक्के वेळ दिला होता, त्यानंतर
दुसऱ्या व तिसऱ्या भागाच्या अभ्यासाला तुम्ही प्रत्येकी
२० टक्के वेळ द्या, व शेवटचा म्हणजे, Neither
Important-nor-Urgent. आता जो भाग महत्वाचाही नाही अन
तात्काळ अभ्यासाचाही नाही, त्याला कशाला वेळ
द्यायचा...? फारफार तर १० टक्के वेळ अशा भागासाठी आपण
नियोजन करताना राखुन ठेवावा. आश्चर्य म्हणजे आपल्या
अभ्यासक्रमातील असा भाग खुप जास्त असतो, तो तितकासा
interesting देखील नसतो, व त्यामुळे एखादा विषय सोपा
असुनही vast असल्याने आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. हे
सगळं करताना एका गोष्टेचं भान ठेवणं महत्वाचं आहे, ते
म्हणजे, असे नियोजन करताना आपले concepts weak राहणार
नाहीत याची काळजी घेणे... कारण आपण केवळ परिक्षेसाठीच
शिकत नसुन भविष्यात कुठेतरी त्याचा उपयोग आपल्याला
होणार असतो. जाता जाता एक गोष्टही सांगावीशी वाटते की,
संपुर्ण अभ्यासक्रमावर सखोल ज्ञान मिळवणं हे सहज शक्य
व आवश्यकही नाही.त्यामुळे काही भाग शिकता आला नाही,
किंवा समजला नाही तर त्याबाबत न्युनगंड बाळगु नका,
त्याच्या भितीमुळे इतर अभ्यासावरही परिणाम होतो, हे
लक्षात असु द्या. आता आपण Planning म्हनजेच नियोजनाकडे
वळुया.
· नियोजन कसे करावे?
इंग्रजीमध्ये एक खुप चांगले सुभाषित आहे- “If you
fail to plan; you plan to fail”. म्हणजेच, तुम्ही
नियोजन करण्यात अयशस्वी झालात, तर त्याचा सरळ अर्थ आहे
की, तुम्ही अयशस्वी होण्याचे नियोजन केलेत. काही मुले
खुप अभ्यास करतात, मात्र त्यांच्या कष्टाचे रुपांतर
कधीकधी मार्कांमध्ये होत नाही, यापाठीमागचे कारण हे
सुयोग्य नियोजनाचा अभाव हेच असते.
अभ्यासाचे नियोजन हे दोन टप्प्यात करावे. Short Term
Planning & Long Term Planning. STP मध्ये तुम्ही
प्रत्येक दिवशी किंवा आठवड्यात जो अभ्यास करणार आहात,
त्याचे नियोजन करा. ते दिवसनिहाय व तासानिहास असावे,
म्हणजे दर सोमवारी मी संध्याकाळी ६ ते ७ पर्यंत दररोज
गणिताचा अभ्यास करेल, नंतर फिजिक्स, किंवा जो कोणता
विषय असेल, त्याचा... असे नियोजन करावे. हे करताना
आपल्या क्षमतेचा विचार करा. बरेचदा आपण स्वत:ला Over
Estimate करुन नियोजन करतो, मग नंतर आपण खुपच मागे
पडलो असे वाटते. माझ्या मित्रांनो, हे साहजिकच आहे.
सुरवातीला तुमचे नियोजन कोलमडुन पडेल, तुम्ही
ठरवल्यानुसार अभ्यास होणार नाही, मात्र प्रयत्नपुर्वक
स्वत:च्या कमतरता लक्षात घेवुन नियोजन केले की तुम्ही
यशस्वी व्हाल.
अभ्यास साठवुन ठेवण्याची जी क्षमता आहे, त्याचे
मुल्यमापन “Retention rate” या संज्ञेच्या माध्यमातुन
केले जाते. त्यानुसार ऎकण्याच्या माध्यमातुन ५%,
वाचनातुन १० %, पहाण्यातुन २० %, उदाहरणांच्या
demonstrations च्या माध्यमातुन ३० %, चर्चेमधुन ५० %,
स्वत: प्रयोग केल्याने ७५ %, व दुसऱ्यांना शिकवण्यातुन
किंवा त्या शिक्षणाचा उपयोग करण्यातुन ९० %
स्मरणक्षमता वाढु शकते. म्हणुनच अभ्यासाबाबत
एकमेकांसोबत चर्चा करा, दुसऱ्यांना समजावुन सांगा.
त्यातुन तुम्हालाच फायदा होइल. Long Term Planning
करताना आपल्यासमोरील सर्व अभ्यासक्रमाचा आढावा घ्या.
परिक्षेपर्यंत तुम्ही त्याचा अभ्यास कसा करणार आहात,
याचे वेळापत्रक तयार करा, व ते पाळण्याचा प्रयत्न करा.
· पुस्तके कोणती वाचावीत?
केवळ अभ्यासक्रमातीलच पुस्तके वाचावीत असे मी
अजिबात म्हणणार नाही, साहित्यिक स्वरुपाचीही पुस्तके
तुम्ही नक्की वाचा. डॉ. आंबेडकरांसारख्या व्यक्तीचे तर
ग्रंथावर खूप प्रेम, त्यांचं संपूर्ण ‘राजगृह’ म्हणजे
ग्रंथालय, त्यांना ग्रंथ आपले ‘स्नेही सोबती’ वाटत.
मराठी म्हणजे माय माऊली - अगदी पोटाशी धरणारी वाटत
असे. ‘समाजाने मला बहिष्कृत केले, थोर ग्रंथानी मला
पोटाशी घेतले! त्यांच्या सारखा जगात स्नेही नाही,
मातेसारखे मार्गदर्शन यांनीच केले! तर लोकमान्य
टिळ्कांना ‘ग्रंथ हेच गुरु’ वाटत. ते म्हणत, ‘मी
चांगल्या ग्रंथांच्या घेरावात असेन तर त्यापुढे
स्वर्गप्राप्ती सुद्धा तुच्छ आहे. मी चांगल्या
ग्रंथांच्या घेरावात असेन तर स्वर्गाचे सुख चालून आले
तरी नाकारीन, कारण चांगले ग्रंथ ज्या जागी असतात -
तेथे ते प्रत्यक्ष स्वर्गच निर्माण करतात!’ म्हणुनच
आपण चांगले ग्रंथ वाचली पाहिजेत.
आता आपण अभ्यासक्रमातील पुस्तकांच्या बाबतीत चर्चा
करुया. आजच्या खुल्या बाजारपेठेमध्ये एका विषयावर
शेकडो पुस्तके उपलब्ध आहेत. त्यापैकी नेमके कोणते
निवडावे, हा एक यक्षप्रश्न आहे. मी अभियांत्रिकीच्या
अभ्यासक्रमाला असताना मला हा प्रश्न पडायचा. योग्य
पुस्तकाच्या निवडीवरच तुमचे यश अवलंबुन असते, त्यासाठी
जाहिरातीच्या मागे न धावता, ज्या लेखकाची भाषा
तुम्हाला समजायला सोपी वाटते, ज्यामध्ये उत्तरे
मुद्देसुद व आकृत्यांसह दिलेल्या असतील अशी पुस्तके
वापरल्यास नक्कीच फायदा होतो. शिक्षकांनी सांगितले
आहे, किंवा आपला मित्र वापरतो, म्हणुन मोठ-मोठी जाडजुड
पुस्तके घेऊ नका. एकच पुस्तक दोनदा वाचणे हे दोन
पुस्तके एकदा वाचण्यापेक्षा अधिक चांगले असते.
त्यामुळे वेगवेगळी पुस्तके हाताळु नका. तुम्ही पुस्तक
वाचुन त्यात तुम्हाला जो भाग समजला आहे, तो तुमच्या
भाषेमध्ये न बघता लिहुन काढा. यालाच नोट्स काढणे असे
म्हणतात. पुस्तकातील उतारेच्या उतारे कॉपी करण्याला
नोट्स म्हणत नाहीत, म्हणुन आपल्याला समजलेलेच, आपल्या
वहीत लिहा, व नंतर आपले concepts पडताळुन पहा. एक
गोष्ट मात्र लक्षात असु द्या, ती म्हणजे- Having no
concept is better than mis-concept. म्हणुनच आपल्या
शंका-कुशंकांचे आपल्या मित्रांकडुन, शिक्षकांकडुन
निरसन करुन घ्या, त्यासाठी मुख्यत: योग्य प्रश्न
विचारण्याची सवय लावुन घ्या.
· वाचन कसे करावे?
वाचन करण्याच्या चार पध्दती आहेत- Scanning,
Skimming, Word-by-word आणि Reading to Study अशा या
पध्दती आहेत. Scanning मध्ये आपण प्रत्येक पानावर नजर
फिरवतो, त्यातील महत्वाचे keywords शोधतो. Skimming
मध्ये आपणास त्या विषयाचा overview पहाण्यास मिळतो.
आपल्याला सहजपणे समजण्यासारख्या गोष्टींचे वाचन आपण या
वाचनपध्दतीमध्ये करतो. यामध्ये बोरिंग असलेला भाग
वगळला तरी चालतो. शब्द-न-शब्द वाचुन त्याचा अन्वनार्थ
लावण्याच्या वाचनपध्दतीला Word-by-word reading
म्हणतात. तर विषयाचे सखोल ज्ञान मिळवण्याच्या दृष्टीने
केलेले वाचन म्हणजेच reading to Study. यामध्ये आधी
वाचन करुन, त्याचा स्वत:च्या मनाशीच review घेतला
जातो. वर उल्लेखलेल्या अभ्यासक्रमाच्या चार भागांचा
म्हणजेच Important & Urgent नुसार आपण वाचनाची पध्दती
अनुसरली पाहिजे. म्हणजेच Important & Urgent साठी
Reading to Study तर Neither Important Nor Urgent
साठी Scanning या पध्दतीचा वापर केल्यास अधिक
नियोजनपुर्वक अभ्यास करता येइल.
· वेळेचे व्यवस्थापन
आजच्या जगात Management म्हणजेच व्यवस्थापन या शब्दावर
जास्त भर दिला जातो. उपलब्ध resources चा कमीत कमी
वापर करुन जास्तीत जास्त output देणाऱ्या
कार्यपध्दतीला व्यवस्थापन म्हटले जाते, अशी ढोबळपणाने
व्यवस्थापनाची व्याख्या करता येईल. वेळेचे व्यवस्थापन
ही सर्वसमावेशक संकल्पना असुन Time is Money च्या
आजच्या परिस्थितीमध्ये याला सर्वाधिक महत्व पाप्त झाले
आहे. सर्वप्रथम आपण आपल्या सध्याच्या जीवनपध्दतीचे
अवलोकन करा. एका कागदावर आपला दिवसाचा वेळ कसा जातो,
ते लिहुन काढा. मग तुम्हाला जाणीव होईल की आपण आपला
बराचसा वेळ निरर्थक वाया घालवत असतो. मग एकदा का
तुम्हाला loop holes सापडले, की त्याचे नियोजन करा.
प्रत्येक वर्षारंभापुर्वी एक डायरी घ्या, व त्यामध्ये
दररोज तुम्हाला करावयाची कामे व त्यासाठी लागणारा
कालावधी नोंदवा. त्याचा दुसऱ्या दिवशी/आठवड्याला आढावा
घ्या. सुरवातीला, तुमचा अंदाज चुकेल, पण नंतर तुम्ही
तुमच्या नियोजनासोबत रहाल.
· ध्येय साध्य करण्याची टप्प्याटप्प्याची पध्दत
(Stair Method)
आपले ध्येय साध्य करण्यासाठी Stair Method म्हणजेच
पायरीच्या अथवा टप्प्याटप्प्याच्या पध्दतीचा अवलंब
करा. या पध्दतीमध्ये तुलनेने लहान असलेले ध्येय
नजरेसमोर ठेवुन त्यानुसार नियोजन करा व त्याची
प्राप्ती करावी. एकदा का तुम्हाला लहान गोष्टी साध्य
केल्याने आत्मविश्वास आला, की मग तुम्ही अवघड
वाटणाऱ्या गोष्टीही सहज साध्य करु शकाल. मात्र ध्येय
ठरवताना हे आपले अंतिम ध्येय नाही, तर ही एक पायरी
आहे, हे पक्के ध्यानात ठेवा, अन्यथा आपल्या यशाच्या
प्रवासातील केवळ एक थांबाच आपला शेवटचा थांबा होऊन
जाईल. Low aim is crime हे सुत्र मनात बिंबवा. जर
तुमचा मार्ग सुंदर असेल, त्यात खाच खळगे नसतील तर
तुम्ही चुकीच्या वाटेवर असण्याची शक्यता आहे, आणि जर
तुमचे ध्येय सुंदर असेल, तर मग वाटेतील खाचखळग्यांची
पर्वा करु नका. बऱ्याचदा आपल्याला चालढकल करण्याची सवय
असते, त्याचा ताबडतोब त्याग करा. आजचे लहान का होईना,
पण आजच ते काम पुर्ण करा, ते उद्यावर कधीच ढकलु नका.
उद्या कधीच उजाडत नसते हे लक्षात असु द्या.
४) अभ्यास केव्हा करावा ? (WHEN)
अभ्यास करण्याची योग्य वेळ असते मात्र मुहुर्त
नसतो. जर आपल्यासाठी वेळ थांबत नसेल, तर आपण त्याची
वाट का पहावी? चांगल्या गोष्टी करण्यासाठी कोणतीही वेळ
वाईट नसते. त्यामुळे अभ्यास केव्हा करावा या प्रश्नाचे
उत्तर आहे... आजच. आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये
वेगवेगळ्या वेळी आपल्या मन एकाग्रतेची क्षमता वेगवेगळी
असते. जेव्हा आपण फ्रेश मुड मध्ये असता, म्हणजे पहाटे
किंवा सकाळी, तेव्हा आपण अवघड विषयांचा अभ्यास करावा.
संध्याकाळी किंवा रात्री तुमच्या आवडत्या विषयाचा
अभ्यास करा किंवा सकाळची उजळणी करा. यामुळे तुम्हाला
कंटाळा येणार नाही. एक गोष्ट लक्षात असु द्या की,
अभ्यासाइतकीच Revision म्हणजे उजळणी महत्वाची आहे.
बऱ्याचदा आपण एखाद्या विषयाचा Theory या भागाचा अभ्यास
प्रथमत: करतो, व नंतर त्यासंबंधीची उदाहरणे सोडवतो,
सगळी Theory झाल्यावर मग उदाहरणे (Problems)
सोडवण्यापेक्षा दोन्ही Simultaneous म्हणजे सोबतीने
सोडवा, त्यामुळे तुमचे Theoretical ज्ञान अधिक पक्के
होइल.
५) अभ्यास कोठे करावा ? (WHERE)
अभ्यास करण्यासाठी जागेची आवश्यकता नसते, त्यासाठी
इच्छाशक्ती लागते. नगरपालिकेच्या दिव्याखाली अभ्यास
करणाऱ्या अनेक व्यक्ती विश्वविख्यात झाल्या आहेत.
त्यामुळे अभ्यासासाठी अमुकच वातावरण असायला हवे हा
अट्टाहास नसावा. आपण जर ध्येयनिष्ट असाल तर मग अशा
अडचणी आपल्याला अडचणी वाटणारच नाहीत. याच अडचणीच
आव्हाने असणार आहेत, व हीच आव्हाने म्हणजे संधी असणार
आहेत. Crisis हा चिनी शब्द दोन शब्दांपासुन बनलेला
आहे. त्यापैकी एक आहे, Danger व दुसरा आहे
Opportunity. म्हणुनच तुमच्यासमोरील प्रत्येक आव्हाण
स्विकारा अन यशाच्या रस्त्यावर मार्गस्थ व्हा.
६) मार्गदर्शन कुणाचे घ्यावे? (WHO)
ग्रामीण भागातील मुलांना दोन गोष्टींचा नेहमीच अभाव
जाणवतो, पहिली म्हणजे योग्य मार्गदर्शन व दुसरी म्हणजे
स्वत:ची खरी क्षमता ओळखुन अभ्यास करण्यासाठी प्रवृत्त
करणारे Inspiration रुपी व्यक्तिमत्व. पण आता संगणक
युगाने यावर मात केली आहे. एकलव्याप्रमाणे
द्रोणाचार्यांच्या पुतळ्यासमोर अभ्यास करुन
द्रोणाचार्याच्या आवडत्या शिष्याला, म्हणजेच-
अर्जुनाला मागे टाकण्याचे कर्तृत्व आपणही करु शकतो, हे
लक्षात घ्यायला हवे. व्हिडिओ ट्युटोरियलच्या
माध्यमातुन असंख्य कोर्सेस विनामुल्य शिक्षणासाठी
इंटरनेटवर आहेत, त्याचाही आपण वापर केला पाहिजे. काही
वर्षापुर्वीच भारतातील नामांकित आय.आय.टी. सारख्या
संस्थेंनी NPTEL च्या माध्यमातुन अभियांत्रिकीचे सर्व
विभागातील सर्वे विषयांचे व्हिडिऒ व पी.डी.एफ. फाइल्स
त्यांच्या वेबसाईटवर विनामुल्य उपलब्ध करुन दिले आहेत.
म्हणजेच आता आय.आय.टी. मध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांकडुन
तुम्हीही घरबसल्या शिकु शकता. गरज आहे, ती आपण पुढे
येण्याची, व ज्या कामासाठी आपण इंटरनेटचा वापर करणार
आहोत, त्यापासुन न भरकटण्याची.
आणखी एका गोष्टीचा मला येथे उल्लेख करावा वाटतो की आपण
प्रत्येक गोष्टीला कारणे देत बसतो, ती वृत्ती आपण
सोडली पाहिजे. ज्याची कारणमिंमासा आपल्याला करता येत
नाही, त्यांना आपण नशिबावर सोडतो. पण एक लक्षात
घ्यायला हवे की, नशीब म्हणजे योग्य अभ्यास व योग्य
संधींचा सुवर्णमध्य. तुमची परिपुर्ण तयारी असल्याशिवाय
व प्रत्येक आव्हान हे संधीच्या दृष्टीकोनातुन
पाहिल्याशिवाय नशिब साथ देत नसते.
· परिक्षा देताना हे लक्षात असु द्या:
परिक्षेला जाण्यापुर्वी आपण सर्व आवश्यक साहित्य सोबत
घेतलेले आहे, याची खात्री करा. परिक्षेचे हॉलतिकिट न
चुकता घ्या. महत्वाचे म्हणजे Negative Minded
व्यक्तींशी बोलु नका. वर सांगितल्याप्रमाणे संपुर्ण
अभ्यासक्रमावर आपण कधीच command मिळवु शकत नाही,
त्यामुळे तुमचा काही अभ्यास अपुर्ण असेल, तर त्याचा
विचार करत आपला मुड खराब करु नका. परिक्षा देताना,
आपला सर्वात आधी संपुर्ण प्रश्नपत्रिका वाचुन काढा.
योग्य प्रश्नांची निवड म्हणजेच अर्धे यश असते, हे
विसरु नका. हवे तर १० मिनिटे त्यासाठी द्या.
त्याप्रश्नांचे उत्तरे लिहिण्यासाठी त्यांच्या
मार्कांच्या आधारे वेळेचे नियोजन करा. त्यापैकी सर्वात
सोप्या प्रश्नापासुन सुरुवात करा. प्रश्नाची उत्तरे
लिहिताना शक्य झाल्यास दोन रंगाच्या पेनचा वापर करा.
महत्वाचे मुद्दे व शिर्षक अधोरेखित करा. आपल्या
उत्तराच्या समर्थनार्थ आवश्यक तेथे figures, flow
chart काढा. त्यामुळे तुम्हाला त्या मुद्याचे सखोल
आकलन झाले असल्याचे केवळ उत्तराकडे नजर टाकताच
परिक्षकाच्या लक्षात येईल. जर पेपर कठिण आला असेल, तर
अजिबात विचलित होऊ नका, कारण तो जर अवघड असेल, तर तो
सर्वांनाच अवघड असेल. त्यामुळे आपल्याला इतरांपेक्षा
कमी मार्क पडेल, ही भिती मनातुन काढुन टाका. आय.आय.टी.
सारख्या संस्थेमध्ये Relative Grading ही मुल्यांकनाची
पध्दत आहे. म्हणजे, तुमच्या वर्गातील इतर
विद्यार्थ्यांच्या तुलनेत तुम्हाला किती मार्क आहेत,
यावर आपली टक्केवारी ठरत असते. त्यामुळे अवघड पेपरची
भिती मनात असु देऊ नका. भितीमुळेच आपल्या हातुन चुक
घडण्याची शक्यता जास्त असते. आणि सर्वात शेवतचे आणि
महत्वाचे म्हणजे, पेपर दिल्यानंतर त्या पेपरची चर्चा
करु नका.
आतापर्यंत आपण सहा महत्वाच्या ’क’ वर चर्चा केली. हे
सर्व झाल्यानंतरही आपल्याला अपयशाची भिती वाटते काय?
मग ती घालवण्यासाठी माझ्या स्वत:चेच उदाहरण देतो.
अभियांत्रिकीच्या अभ्यासक्रमाला सिव्हिल
इंजिनिअरिंगसाठी मी १९९९ मध्ये प्रवेश घेतला, त्यावेळी
मी तुमच्यापैकीच एक होतो. नवीन वातावरणामध्ये नाही
म्हटले तरी त्यावेळी मी थोडासा भरकटलेलाच होतो. मला
माझे ध्येय दिसत नव्हते, व त्यामुळे आपल्याला नेमके
काय करायचे आहे तेच कळत नव्हते. बोलता-बोलता पहिल्या
semester ची परिक्षा जवळ आली. पण अभ्यास तर काहीच
नव्हता. तशातच पेपर दिले, व त्यात मी चक्क नापास झालो.
पण, आश्चर्य म्हणजे अवघड समजले जाणारे मॅथेमॅटिक्स व
माझा आवडता सिव्हिल इंजोनिअरिंग या विषयामध्ये मी
उत्तीर्ण झालो होतो व उर्वरित तीन विषयांमध्ये मी
नापास झालो होतो. दुसऱ्या semester मला मार्ग गवसला
नव्हता व बुडत्याचा पाय खोलात या म्हनीची मला अनुभुती
झाली. वर्षाच्या शेवटी माझे दहापैकी फक्त चारच विषय
निघाले. तोपर्यंत मी अपयश पाहिलेले नव्हते, पण
त्यावर्षी मी कमीत कमी ७ विषयातही पास होऊ न शकल्याने
मला एक वर्ष घरी बसावे लागले.
त्यावेळी मी निश्चितच निराश झालो होतो. पण अभ्यास न
करता पास होणेही शक्य नव्हते. मी माझ्या चुकांमुळेच
नापास झालो होतो. सुदैवाने मी त्या वर्षामध्ये खुप
पुस्तके वाचली. नरेंद्र जाधवांचे “आमचा बाप अन आम्ही”
या पुस्तकाने मला एक दिशा दिली, अन मी स्वत:ची बुध्दी
किती कमी प्रमाणात वापरत होते ते माझ्या लक्षात आले.
असं म्हणतात की, अपयशाची दरी पाहिल्याशिवाय यशाचे शिखर
सर करता येत नाही. नव्या शतकातले पहिले वर्ष म्हणजे
२००० साल माझ्यासाठी Turning Point ठरले. मी
सकारात्मकरित्या वरील सहा “क”रांत प्रश्न स्वत:लाच
विचारले. त्यांची माझ्या स्वत:च्या व्यक्तीमत्वाला
जुळतील अशी उत्तरे शोधली. २००१ साली मी
इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षाला Admission घेतले,
माझी अभ्यासाची पध्दत वापरली, मी त्यावेळी पहिल्या
वर्षाच्या विषयांमध्ये उत्तीर्ण तर झालोच, पण दुसऱ्या
वर्षाच्या परिक्षेत वर्गात पहिलाही आलो. तिसऱ्या वर्षी
आमच्या कॉलेजमध्ये पहिला व पुणे विद्यापिठात दुसरा
आलो. असे म्हणतात एक यश दुसऱ्या यशाला जन्म देते,
याचाच परिपाक म्हणुन मी शेवटच्या वर्षी म्हणजेच २००४
साली सबंध पुणे विद्यापिठात पहिला आलो, अन मला मानाचे
शारंगपाणी सुवर्णपदक मिळाले.
शेवटच्या वर्षी मी केवळ अभ्यासातच गुंग नव्हतो तर
आमच्या कॉलेजमध्ये चालणाऱ्या वेगवेगळ्या activities
मध्ये सहभागी होतो. आमच्या कॉलेजचा General Secretary,
NSS Leader, Magazine Secretary, साहित्य शारदा या
भिंतीपत्रकाचा In-charge अशा वेगवेगळ्या events
मध्येही मी सक्रिय सहभाग घेतला. केवळ मार्कांरुपी
मिळालेले यश हे परिपुर्ण नसते, किंबहुना कोणतेही यश हे
अपुर्णच असते, किंवा त्याला पुढे जाण्यासाठी निश्चितच
वाव असतो. असे म्हणतात ना... Excellence is a Journey;
and not a destination…!
बी.ई.च्या यशानंतर मी फेब्रुवारी-२००५ मध्ये होणाऱ्या
GATE या आय.आय.टी.च्या एम.टेक या पदवीत्तर शिक्षणासाठी
नोकरी करता करता अभ्यास सुरु केला. सुदैवाने, महाराष्ट
लोकसेवा आयोगाने त्याच महिण्यात महाराष्ट्र
अभियांत्रिकी सेवा या पदासाठी परिक्षा जाहीर केली
होती. माझी इच्छा नसताना, मित्रांच्या आग्रहास्तव मी
अभ्यास केला व या दोन्ही परिक्षा दिल्या. गेटमध्ये मी
भारतातील सर्वोत्तम ५ टक्के मुलांमध्ये आलो, व मला
आय.आय.टी. कानपुर येथे पुढील शिक्षणासाठी प्रवेश
मिळाला. दोन वर्षाचा अभ्यासक्रम मी २००७ मध्ये पुर्ण
केला, व नोकरी शोधण्यापुर्वीच एम.पी.एस.सी.चा निकाल
लागला व मी महाराष्ट्रात प्रथम आलो. सप्टेंबर-२००७
रोजी मी सहायक कार्यकारी अभियंता या पदावर जलसंपदा
विभागात रुजु झालो. हे सर्व सांगण्याचा उद्देश फक्त
एवढाच की, जोर्वे नावाच्या एका खेड्यातुन शेतकरी
कुटुंबातुन येऊन, मराठी माध्यमातुन शिक्षण घेवुन,
इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षाला नापास होऊनही मी
इथपर्यंत पोहचु शकलो. हे सर्व नशिबापेक्षा कष्टांवर व
स्वत:वर विश्वास असणारा कोणीही करु शकतो.
शेवटी जाताजाता मला कालच मिळालेला एक SMS आपल्या
सर्वांना सांगावासा वाटतोय- A man asks to God- मनुष्य
परमेश्वराला मागतो- “Give me EVERYTHING to enjoy
LIFE” म्हणजेच “हे देवा मला आयुष्य जगण्यासाठी
सर्वकाही दे”. God says, परमेश्वर त्याला म्हणतो- “I
have given you LIFE to enjoy EVERYTHING”… “मी तुला
सर्वकाही करण्यासाठी आयुष्य दिले आहे”. आपण
प्रत्येकाने आपली खरी क्षमता ओळखल्यास व त्याचा वापर
केल्यास आपले आयुष्य सुखमय होईल, अशी मला खात्री आहे.
आपल्या उतारवयात आपले संपुर्ण आयुष्य movie is flash
back मध्ये असल्यासारखे असेल. ते पहाण्याजोगे असावे
असे करण्यासाठी आजपासुनच आपण प्रयत्न करावा असा आशावाद
मी या ठिकाणी व्यक्त करतो. “How to Top with Minimum
Study” अशा शिर्षकाचे पावरपॉंइंट प्रेझेंटेशन मी
आपल्या सर्वांसाठी तयार केले आहे, व ते माझ्या
www.pravinkolhe.com या वेबसाईट वरुन आपण डाऊनलोड करु
शकता.
सर्वात शेवटी, मला येथे संयोजकांनी बोलवल्याबद्दल मी
त्यांचे आभार व्यक्त करतो, व आपण सर्वांनी माझे बोलणे
ऎकुण घेतले, याबद्दल आपलेही आभार मानुन मी श्री संत
गाडगेमहाराज यांचे चरणी वंदन करुन माझे व्याख्यान
आटोपते घेतो.
जयहिंद. |