Steve Jobs

 

       स्टिव्ह जॉब्ज होता तरी कोण ? विज्ञानाची जाणीव करून देणारा न्यूटन? निसर्गातील विज्ञानाची किमया नियमांत बांधणारा आइन्स्टाइन? विश्वाचे रूप बदलणारा किमयागार एडिसन? की आर्किमिडिज? सर्वसाधारणपणे एखादी व्यक्ती निवर्तली की, त्याच्यानंतरचे ८-१० दिवस त्याच्याविषयीची चर्चा सुरू राहते आणि नंतर.. ‘जन पळभर म्हणतील हाय हाय’ प्रमाणे हे जन कामाला लागतात आणि सारे काही विसरून जातात.
.. पण जॉब्ज यांच्या बाबतीत असे काही होणार नाही, याची आज प्रत्येकाला खात्री आहे. त्यांच्या जाण्याला शतक उलटून गेले तरीही आइन्स्टाइन आणि एडिसनप्रमाणे त्यांच्या नावाची आणि कर्तृत्वाची चर्चा होतच राहील. जॉब्ज यांनी असे काय केले की, त्यामुळे हे शतक त्यांच्या नावे नोंदले जाईल? .. त्यांनी केलेल्या दोन गोष्टींनी संपूर्ण जगाचा चेहरामोहरा बदलण्याचे काम केल्याची नोंद त्यांच्या नावावर असणार आहे. यातील एकाने जगाचा चेहरामोहरा आणि भविष्य बदलले आहे तर दुसऱ्याची आता कुठे सुरुवात झाली आहे!
यातील पहिले आहे ते टचस्क्रीन. आज आपल्याला टचस्क्रीन असे म्हणताना त्यात फारसे काही नावीन्य वाटत नाही. पण कल्पना करा की, जो मानवी स्पर्श हा केवळ ‘ती’ बाब ‘सजीव’ असण्याचा एक महत्त्वाचा निकष ठरते, ‘ती’ ‘स्पर्शा’ची जाणीव त्यांनी निर्जीव असलेल्या यंत्राला प्राप्त करून दिली! हा शतकातील खूप मोठा बदल होता. खरे तर तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील ती क्रांतीच होती. त्यामुळे नंतरच्या प्रगतीची दिशाच पार बदलून गेली. हे क्रांतिकारी टचस्क्रीन तंत्रज्ञान त्यांनी त्यांच्या विविध उत्पादनांमधून आणले. आता तर टचस्क्रीन नसेल, तर शाळकरी मुलेही ते तंत्रज्ञान पार मागासलेपणाचे लक्षण समजतात, हे स्टिव्ह जॉब्ज यांचे यश आहे!
टचस्क्रीन ही भविष्यातील क्रांती असणार हे काय फक्त स्टिव्ह जॉब्जनाच कळले होते? छे! हेच भविष्यातील तंत्रज्ञान असणार याची जाणीव जगभरात अनेकांना झाली होती. पण तिथे सर्वात आधी पोहोचणारे, प्रयोग करणारे आणि ते तंत्रज्ञान हे ‘सिद्ध तंत्रज्ञान’ म्हणून बाजारात आणणारे पहिले स्टिव्ह जॉब्ज होते. इतरांच्या आधी आपल्याला भविष्याची जाणीव होणे, त्या दृष्टीने पछाडल्यागत प्रयत्न करणे आणि सारे ‘सिद्ध’ करणे या साऱ्यांत जॉब्ज अग्रेसर तर होतेच. पण त्यांचे यश हे केवळ या गुणविशेषांमध्ये नाही. कारण हे गुणदेखील काही जणांमध्ये असतात किंवा आहेत. तर हे सारे करण्यामागे स्वतचे असे एक तत्त्वज्ञान असणे, हे जॉब्ज यांचे वेगळेपण होते. ग्राहकासाठी वापरकर्त्यांसारखे ‘सारे काही सोपे’ असले पाहिजे, हा त्यांच्या क्रांतीचा मंत्र होता. त्यासाठी ते झटत होते. साधे-सोपे तत्त्वज्ञान हीच जगातील सर्वात कठीण गोष्ट असते. आणि ते प्रत्यक्षात अमलात आणणे तर त्याहूनही कठीण. तेच तर जॉब्ज यांनी करून दाखवले.
जॉब्ज यांनी त्यांच्या हयातीत ज्याप्रमाणे टचस्क्रीनची क्रांती आणली आणि जगाचा चेहरामोहरा बदलला तशाच आणखी एका क्रांतिपर्वाला त्यांनी जाता जाता सुरुवात करून दिली. हे क्रांतिपर्व आहे ‘व्हॉइस रेकग्निशन’चे! जसे टचस्क्रीनचे झाले तसेच काहीसे या तंत्रज्ञानाबाबतही घडले. ‘सिद्ध’ झालेले व्हॉइस रेकग्निशन तंत्रज्ञान आता जॉब्ज यांनी त्यांच्या मृत्यूच्या दोनच दिवस आधी ‘आयफोन ४ एस’च्या निमित्ताने बाजारपेठेत आणलेले असले तरी हे भविष्याचे तंत्रज्ञान आहे, याची जाणीव सर्वात आधी १९५२ साली म्हणजेच तब्बल ६० वर्षांपूर्वी झाली. त्यानंतर अनेकांनी अनेक प्रयत्न केले. गेल्या १० वर्षांत तर सारे जग या तंत्रज्ञानाच्या मागे लागले होते. संपूर्ण जगाचीच एक मोठी स्पर्धा सुरू होती. .. स्टिव्ह जॉब्ज तसे गप्पच होते. पण थांबलेले मात्र नव्हते. त्यांच्या डिझायनर्सना, त्यांच्या तंत्रज्ञांना, सॉफ्टवेअर डेव्हलपर्सना ते सांगत होते नेमके काय अपेक्षित आहे ते. उद्दिष्ट त्यांनी समोर ठेवलेले होते. उद्दिष्ट सामान्यांसाठी वापरण्यास सोपे सुलभ असे व्हॉइस रेकग्निशन तंत्रज्ञानाचे होते. पण तेच तर खरे कठीण होते.
या जगाचा निरोप घेण्याच्या दोन दिवस आधी त्यांनी सिद्ध केलेले, तावूनसुलाखून बाहेर पडलेले हे तंत्रज्ञान ‘अ‍ॅपल’ने बाजारात आणले. अ‍ॅपलने ‘आयफोन ४ एस’ बाजारात आणला, त्या वेळेस लोकांच्या भुवयाही उंचावल्या गेल्या. काहींची पहिली प्रतिक्रिया आली की, आयफोन- ४ बाजारात आघाडीवर असताना आता नवे मॉडेल आणण्याच्या फंदात अ‍ॅपल का पडली आहे? पण त्याचा उलगडा नंतर दिवसभरातच झाला. .. कदाचित ते स्वप्नवत वाटणारे तंत्रज्ञान जागतिक बाजारपेठेत दाखल झालेले पाहावे आणि मगच डोळे मिटावेत, असे स्टिव्हना वाटले असेल? आणि वाटलेच असेल तर त्यात नवल काय? कारण हे क्रांतिकारी तंत्रज्ञान पुढच्या ६० ते ७० वर्षांवरच नव्हे तर कदाचित.. या शतकावर राज्य करणार आहे!
आता तुमचा आवाज हेच तुमचे चलन असणार आहे. जगाचे सारे व्यवहार केवळ आवाजावर होतील. सर्वात महत्त्वाचे म्हणजे टचस्क्रीनप्रमाणेच निर्जीव यंत्राला सजीव आवाजच नव्हे तर त्यातील शब्द आणि त्याहीपुढे जाऊन त्याचा अर्थ समजावून घेण्याची जाणीव स्टिव्हने करून दिली आहे. खरे तर ही जाणीव म्हणजे एक अमूल्य अशी देणगी आहे.
व्हॉइस रेकग्निशनवर काम करणारी काही यंत्रे आज अस्तित्वात आहेत. पण त्यात अनंत समस्या आहेत. आपण यंत्राला कमांड अर्थात आदेश देत असताना आजूबाजूला सुरू असलेल्या अनेक बाबींचे, यंत्रांचे आवाज सुरू असतात. अशा वेळेस ते यंत्र आपले आदेश ऐकत नाही. कारण त्याला कोणत्याही ध्वनिप्रदूषणाशिवाय किंवा सरमिसळीशिवाय तुमचा आवाज ‘आदेश’ म्हणून ऐकण्याची सवय असते. यावर काही जणांनी ‘नॉइज कॅन्सेलेशन’ म्हणजे अनावश्यक आवाज वगळण्याचे तंत्रज्ञानही आणले. मात्र त्याला म्हणावे तसे यश आले नाही. याच बाबतीत साऱ्यांची कोंडी झाली होती.
याशिवाय आणखीही काही महत्त्वाच्या समस्या सर्वानाच भेडसावत होत्या म्हणून तर त्याची चांगली आवृत्ती बाजारात येण्यास एवढा दीर्घकाळ म्हणजे तब्बल ६० वर्षे वाट पाहावी लागली. शब्द समजणे आणि त्याचा व्यक्तीला अपेक्षित असलेला नेमका अर्थ समजावून त्यानुसार आदेशाचे पालन करणे ही त्यानंतरची सर्वात महत्त्वाची अडचण होती. कारण माणसे आपापल्या परीने शब्दांचा वापर करीत असतात. त्यात काहीसा स्वर बदलला तरी अनेकदा शब्द तोच असताना त्याचा अर्थ मात्र बदलतो. हे सारे त्या निर्जीव यंत्राला कसे काय कळणार? शिवाय हे काही फक्त एका भाषेपुरते मर्यादित नाही तर यात जगातील सर्व भाषांचा समावेश करावा लागणार, ही त्या पुढची सर्वात मोठी समस्या होती. याही बाबतीत स्टिव्ह फारसे कधीच बोलत नसत. .. पण यातली मेख त्यांनाच नेमकी कळली आणि त्यांनी सर्व अडचणींवर मात करत एक ‘सिद्ध’ तंत्रज्ञान अर्थात क्रांतीच जगासमोर सादर केली. प्रत्यक्षात त्याच्या जागतिक सादरीकरणासाठी व्यासपीठावर ते स्वत नव्हते, कारण ते मृत्युशय्येवर होते, एवढाच काय तो फरक. पण साऱ्या जगाला हे ठाऊक आहे की, त्यामागे असणारी खरी व्यक्ती आणि प्रेरणास्रोत स्टिव्ह जॉब्ज होते.
आता यापुढे हे व्हॉइस रेकग्निशन तंत्रज्ञान पुढच्या ६०-७० वर्षांवर किंवा कदाचित या शतकावर राज्य करणार आहे. सध्या मोबाइलमध्ये असलेले हे तंत्रज्ञान येणाऱ्या काळात सर्वच उपकरणांमध्ये स्थिरावलेले दिसेल. मग वॉशिंग मशीनही तुमच्याच आवाजावर सुरूही होईल आणि बंददेखील! एखादी गोष्ट तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात ‘सिद्ध’ म्हणून समोर आणण्यासाठी निधडी छाती लागते, धैर्य असावे लागते व पराकोटीची प्रयोगशीलता लागते. त्या साऱ्या बाबी त्यांच्याजवळ होत्या आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वत:चे एक तत्त्वज्ञान होते सहजपणाचे.. म्हणूनच ते आपल्याला शतकानुशतके एडिसन आणि आइन्स्टाइनप्रमाणे प्रेरणा देत राहतील ! कारण सर्वात जास्त सोपे हेच सर्वात जास्त कठीण असते !
--------------------------------------------------------------------------------------------------------------------
      स्टीव्हन पॉल जॉब्स् याच्या निवृत्तीची बातमी ही केवळ शेअर बाजारच नव्हे, तर घराघरांतून, विशेषत: तरुण वर्गात चर्चेचा विषय ठरावी ही एकच बाब त्याच्या अफलातून व्यक्तिमत्त्वाची ओळख पटविते. स्टीव्ह जॉब्स् ही एक जीवनशैली आहे. तंत्रज्ञानाला कल्पकतेने वाकवून बहुसंख्यांचे आयुष्य समृद्ध करणारी जीवनशैली. या जीवनशैलीत उपयुक्तता व सौंदर्य यांचे सुंदर मिश्रण आहे. कल्पकतेला आर्थिक बैठक आहे. भविष्याची चाहूल आहे व त्या दिशेने तंत्रज्ञानाला वळविण्याची ताकद आहे. जगातील उत्तमोत्तम सर्जनशील तरुणांना एकत्र करून लोकांना अचंबित करणारी तांत्रिक निर्मिती करण्याचे कौशल्य आहे. विक्रीकडे गंभीरपणे लक्ष देऊन ‘ब्रॅण्ड’ ठसविण्याचा धोरणीपणा आहे. वागणे-बोलणे बेधडक आहे. आपल्याच मस्तीत जगण्याची झिंग आहे. तरीही पाय जमिनीवर आहेत. असे बहुरंगी, बहुढंगी व्यक्तिमत्त्व म्हणजे अॅपलचा स्टीव्ह जॉब्स्. कल्पक उत्पादनाबाबत कुणी याची तुलना एडिसनशी करतो, तर उत्पादनाची घडण व त्याची विक्री याबाबत कुणी याला वॉल्ट डिस्ने म्हणतो. डिस्ने, एडिसन या प्रतिभावंतांचे सर्व गुणदोष स्टीव्हमध्ये उतरले. अॅपलची एकाहून एक सरस उत्पादने आणि त्यांना मिळणारा ग्राहकांचा उदंड प्रतिसाद याची साक्ष देतात. आपल्याला कारखाना काढायचा नाही तर जगण्याची शैलीच बदलायची आहे असे स्वप्न घेऊन स्टीव्ह वावरतो. तरुण वयातच त्याला या स्वप्नाने झपाटले. अॅपल अगदी लहान कंपनी असतानाच कोका-कोलाच्या मार्केटिंग प्रमुखाला त्याने ऑफर दिली. साखरेचा पाक विकण्यात आयुष्य फुकट घालविणार की जग बदलून टाकणाऱ्या कंपनीसाठी काम करणार, असा सवाल त्याने टाकला. स्टीव्हच्या या प्रश्नाने भारून तो अॅपलमध्ये आला. पुढे दोघांचे मतभेद झाले व स्टीव्हलाच अॅपल सोडावी लागली. दहा वर्षांनंतर स्टीव्ह पुन्हा अॅपलमध्ये आला. मात्र या काळात जग बदलण्याचे काम त्याने सुरू ठेवले होते. संगणकच नव्हे तर संगीत, कला, चित्रपट, ग्राहकोपयोगी उत्पादने अशा विविध क्षेत्रांत आपल्या उत्पादनाचा ठसा स्टीव्हने उमटविला. ‘आयकॉन’ हा शब्द त्याला सर्वार्थाने लागू होतो. मॅक कंप्युटर हे त्याचे पहिले लोकप्रिय उत्पादन. यामध्ये प्रथम माऊस वापरण्यात आला व त्याला ग्राफिक्सची साथ मिळाली. ‘मॅक’ हा लोकांच्या गरजा लक्षात घेऊन बनविलेला पहिला ‘पर्सनल कंप्युटर’ होता. मात्र फक्त ‘पीसी’ बनवून स्टीव्ह थांबला नाही. लोक जेव्हा संगणकाच्या प्रेमात पडले नव्हते, तेव्हाच तो ‘पर्सनल’कडून ‘इंटर पर्सनल’कडे वळला होता. दोन संगणकांना एकमेकांशी संवाद साधता आला पाहिजे व सहकार्याने क्षमता वाढविली पाहिजे असे तो तेव्हाच म्हणत असे. ई-मेल आज परवलीचा शब्द आहे. पण १५-२० वर्षांपूर्वीच ‘नेक्समेल’ने अनेकांना अचंबित केले होते. अॅपलमधून बाहेर पडल्यावर स्टीव्हने ‘नेक्स्ट’ कंपनी स्थापन करून संगणक बनविले. हे संगणक अद्ययावत व काळाच्या बरेच पुढे होते. ते महाग असल्याने फार खपले नाहीत. पण संगणक तंत्रज्ञानातील नव्या नव्या शक्यता या उत्पादनांनी बाजारात आणल्या. अॅपलमधून हकालपट्टी झाली म्हणून स्टीव्ह निराश झाला नाही. संगणक व चित्रपट यांच्यातील नाते त्याला उमगले. पीक्सर इमेज या कंपनीतून त्याने ग्राफिक्स अधिक अद्ययावत करण्याचा धडाका लावला. डिस्ने स्टुडिओशी त्याचा संपर्क आला आणि त्यातून ‘टॉय स्टोरी’सारख्या सुंदर अॅनिमेशनपटाची निर्मिती झाली. पुढे अॅनिमेशनपट हा नवा ट्रेंड झाला आणि २००१पासून ऑस्करनेही त्याची दखल घेतली. स्टीव्हने निर्माण केलेल्या चार चित्रपटांना ऑस्कर मिळाले. नेक्स्ट कंपनी अॅपलने विकत घेतल्यावर तो पुन्हा अॅपलमध्ये आला. कंपनीतील अत्यंत हुशार तरुणांना हाताशी धरून त्याने नवनवीन उत्पादनांचा धडाका लावला. मॅक, आयपॉड, आयपॅड, आयटय़ून, आयफोन अशी एकामागोमाग एक सरस उत्पादने ही जॉब्स्ची करामत. नवीन उत्पादन आणताना तो जगाशी संवाद साधतो. नर्मविनोदी, खुसखुशीत, प्रेरणादायी व चैतन्यशील अशा या संवादावर अब्जावधी तरुण फिदा आहेत. नव्या उत्पादनाच्या सादरीकरणातही त्याची कल्पकता दिसून येते. जॉब्स्ला हे जमते कसे? इतक्या अनेक स्तरांवर माणूस उपक्रमशील व कल्पक कसा राहू शकतो? अनेक कंपन्यांनी अॅपलची नक्कल करण्याचा प्रयत्न केला. ते साफ अपयशी ठरले. अॅपल यशस्वी ठरते कारण तेथे स्टीव्ह आहे. स्टीव्हचे नेतृत्व म्हणजेच अॅपल. या नेतृत्वात सेनापती व संगीतकार यांचा सुरेल मेळ जमला आहे. बाजारपेठेतील युद्धात तो सेनापतीसारखा उतरतो, तर उत्पादनांची निर्मिती सुरू असताना ‘म्युझिक कम्पोझर’सारखे काम करतो. अॅपल लवकरच संपणार अशी भविष्यवाणी डेल कंपनीच्या मायकेल डेल याने वर्तविली होती. अॅपलने ज्या दिवशी डेलला मागे टाकले, त्या दिवशी ‘भविष्याचा माग घेणे मायकेलला जमत नाही हे सिद्ध झाले’, असा खोचक मेल सर्व सहकाऱ्यांना स्टीव्हने पाठविला. कराराची कलमे ठरविताना तो निष्ठुर असतो, पण उत्पादनांबाबत हळवा होतो. बीटल्स त्याला खूप आवडतात. ‘बीटल्समधील चार गायक एकमेकांच्या त्रुटी झाकतात..अॅण्ड टोटल इज ग्रेटर देन सम ऑफ पार्टस्.. मी टीमबरोबर असेच काम करतो’, असे स्टीव्हचे म्हणणे. मात्र व्यवस्थापक म्हणून त्याची भीती वाटते असेही त्याचे सहकारी सांगतात. डिस्नेप्रमाणेच प्रत्येक सहकाऱ्याकडून तो सर्वोत्तम कामाची अपेक्षा करतो. ‘प्रॉडक्टिव्ह नार्सिसिस्ट’ अशी त्याची ओळख मानसशास्त्रात करून दिली जाते. तो कल्पक आहे, कमालीचा उपक्रमशील आहे. झटून काम करणारा आहे व काम करून घेणारा आहे. पण त्याच्या व्यावसायिक यशाचे रहस्य आहे त्याच्या दृष्टिकोनात. आपल्या उत्पादनाचा तो स्वत: ग्राहक आहे. तो आधी ग्राहक असतो आणि मग निर्माता. स्टीव्ह उत्तम अभियंता नाही. यंत्रातील किचकट जोडण्यांमध्ये त्याला रस नाही. त्या तपशिलात तो शिरतही नाही. मात्र ग्राहकाला उत्पादन कसे हवे याचे स्पष्ट चित्र त्याच्या मनात तयार असते. अॅपलच्या विक्री कार्यालयात फक्त आरसा ठेवलेला आहे, असे गमतीने म्हटले जाते. या आरशासमोर उभा राहून स्टीव्ह स्वतच्याच प्रतिमेला विचारतो..‘तुला काय आवडेल?’. आणि मग कामाला सुरुवात करतो. ग्राहकाची भाषा त्याला नेमकी कळते. ‘लोक म्हणत वेगवान घोडे हवेत. म्हणून मी मोटारी बनविल्या’, असे हेन्री फोर्ड म्हणत असत. वेगवान घोडे ही ग्राहकाची भाषा आहे, तर मोटारी हा फोर्ड यांचा प्रतिसाद आहे. फोर्ड यांच्या या वाक्याचा स्टीव्ह वारंवार उल्लेख करतो. केवळ उपयुक्ततेसाठी लोक वस्तू घेत नाहीत. वस्तू हाताळणे, त्या जवळ बाळगणे यात मजा वाटली पाहिजे. ग्राहकाचे मन त्यात गुंतले पाहिजे. अॅपलची उत्पादने ग्राहकाला असा मजेदार अनुभव देतात. त्याला वेगळ्या उंचीवर नेतात. स्टीव्ह जॉब्स्ची खासियत असा खास अनुभव देण्यात आहे. त्याची उत्पादने नेटकी व सुंदर असतात. गेली सहा वर्षे त्याला कर्करोगाने विळखा घातला आहे. त्यातून तो बाहेर पडला असला तरी प्रकृतीची कुरबुर वाढतेच आहे. मात्र त्याच्या कल्पकतेवर बिलकूल परिणाम झालेला नाही. आजही पुढील दहा वर्षे पुरेल इतकी उत्पादनांची सामग्री त्याने अॅपलजवळ ठेवली आहे. २५० पेटंटस् त्याच्या नावावर आहेत. आज संगणकाचा शिरकाव झालेला नाही असे एकही क्षेत्र नाही. या प्रत्येक क्षेत्रात कोणत्या ना कोणत्या मार्गाने स्टीव्ह जॉब्स्चे उत्पादन वापरात येते. स्टीव्ह जॉब्स्ची सीईओ पदावरून निवृत्ती ही यामुळेच अॅपलसाठी सध्या तरी फार चिंतेचा विषय नाही. कंपनीचा अध्यक्ष म्हणून तो काम करणारच आहे. कला, तंत्रज्ञान व व्यवसाय यांच्या तिठय़ावर अॅपल उभी आहे, असे स्टीव्ह मानतो. पण नफा ही त्याची प्रेरणा नाही, तर ग्राहकाला आपल्या उत्पादनातून कलात्मक अनुभव देणे ही त्याची प्रेरकशक्ती आहे. ‘इटस् नॉट प्रॉडक्टस् बट एजन्टस् ऑफ ग्लोबल ट्रान्सफॉरमेशन’ असे तो अभिमानाने सांगतो. लोकांचा जगण्याचा अनुभवच त्याला बदलायचा होता. तसा तो त्याने बदलून दाखविला व आपले जीवन समृद्ध केले. थँक्स स्टीव्ह. !

संदर्भ: लोकसत्ता अग्रलेख

 अ‍ॅपलचा जन्मदाता स्टीव्ह जॉब्स नुकताच कंपनीतून पायउतार झाला. त्याआधी स्टॅनफोर्ड विद्यापीठानं त्याला विद्यार्थ्यांसमोर भाषणासाठी बोलावलं होतं. तेथील भाषणाचा हा स्वैर अनुवाद.. उद्याच्या अ‍ॅपलकारांसाठी:-

मित्रांनो, मला तुमच्यासमोर भाषणासाठी संधी मिळाली, याबद्दल मी मनापासून आपला आभारी आहे. इतक्या प्रतिष्ठित विद्यापीठातील बुद्धिमान मुलांसमोर बोलायला मिळणं, हा मला माझा मोठा सन्मान वाटतो. खरं सांगायचं विद्यापीठाशी माझा संबंध आला तो हा असा आणि इतकाच. कारण तुमच्यासारखं असं माझं शिक्षण कधीच झालं नाही. आता तुमच्यासमोर आलोच आहे, तर मला तीन प्रमुख गोष्टी तुमच्यासमोर उघड करायच्या आहेत.

पहिलं म्हणजे मी माझं महाविद्यालयीन शिक्षण कधीच पूर्ण करू शकलो नाही. सहा महिन्यांतच मला इथल्या वातावरणाचा कंटाळा आला. नंतर कसंबसं वर्ष काढलं मी महाविद्यालयात. पण मी इथं कधी रमलोच नाही. हे असं का झालं असावं? माझ्या दृष्टीनं याची कारणं माझ्या जन्मातच असावीत. माझी आई अविवाहित असतानाच तिला मी झालो. बाळंत झाली तेव्हा ती महाविद्यालयात शिकत होती. तेव्हा तिची परिस्थिती लक्षात घेता तिनं मला दत्तक द्यायचं ठरवलं. एक वकील आणि त्याची सुविद्य पत्नी मला दत्तक घेणार होते. पण ऐन वेळी ते म्हणाले त्यांना मुलगी हवीये. तेव्हा माझी आई चिडली. तिची अट होती की कोणा पदवीधरालाच मला दत्तक द्यायचं. पण हे असं घडलं. तेव्हा ऐन वेळी जो समोर आला, त्याला तिनं मला देऊन टाकलं. अट एकच. मला महाविद्यालयात शिकू द्यायचं. तेव्हा माझे आताचे जे आईवडील आहेत, ते मला लाभले. गरीब होते ते. पण त्यांना मी शिकावं असं प्रामाणिकपणे वाटत होतं. माझ्या खऱ्या आईच्या इच्छेला मान देत त्यांनी मला शिकू द्यायचं ठरवलं. तेव्हा मी महाविद्यालय निवडलं ते अगदी महागडं होतं. अगदी स्टॅनफोर्डइतकं. माझं म्हणणं शिकायचं तर मग स्वस्त महाविद्यालयात कशाला जा. पण खरं सांगायचं तर त्यात काहीही अर्थ नव्हता. कारण मी जे काही शिकत होतो, त्यातलं काहीही मला आवडत नव्हतं. एकीकडे पोटाला चिमटा काढून माझी फी भरणारे माझे आईवडील आणि ओढूनताणून शिकणारा मी. १७ वर्षांचा होतो, तेव्हा हे जाणवलं. मग ठरवलं. हे फार होतंय.

आयुष्यात काय कराचंय ते दिसत नाहीये आणि तरीही आपण आईवडिलांचे घामाचे पैसे असे उधळतोय. हे बरोबर नाही. त्याच क्षणी निर्णय घेतला. हे नावडतं शिकणं थांबवायचं. बाहेर पडलो महाविद्यालयातून. मोकळा श्वास घेतला. एव्हाना जाणवलं होतं, आपण जे काही करतोय ते फारच स्वप्निल आहे. मित्राच्या वसतिगृहावर राहायला गेलो. इतरांच्या रिकाम्या कोकच्या बाटल्या वगैरे विकून जेवायला चार पैसे मिळाले तर मिळवायचो. आठवडय़ातून एकदा मात्र पलीकडच्या गावातल्या हरे कृष्ण मंदिरात जायचो. अर्थात तिथे काही भक्ती वगैरे होती म्हणून नाही. तर तिथे आरतीनंतर मोफत जेवण मिळायचं म्हणून. पण तिथे जायलाही पैसे नसायचे. तेव्हा चालत जायचो. म्हणजे जायचेयायचे १४ किमी अंतर मी चालायचो. या काळात मला प्रश्न पडायचा. मला नक्की काय आवडतंय. तेव्हा लक्षात आलं. आपलं सुलेखन कलेवर प्रेम आहे. मग ते शिकायला लागलो. अक्षरांचे आकार, त्यांचे तलम पोत मला फार आवडायचे. अक्षरांच्या नुसत्या मांडणीतूनसुद्धा काही सांगता येतं, असं मला वाटायचं. आपण त्यांना कसं सादर करतो, यावर बरंच काही अवलंबून असतं, हे मला जाणवलं. त्यामुळे मी त्या कलेचं शिक्षण घ्यायला लागलो. जे शिकतोय त्याचा काय उपयोग, नोकरी मिळणार आहे का त्यामुळे, वगैरे फालतू प्रश्नांनी मी मला विचलित होऊ देत नव्हतो. आवडतंय ना.. शिकायचं. इतकाच तो विचार.
 

पुढे १० वर्षांनी जेव्हा मी माझा पहिला संगणक तयार केला, तेव्हा या सुलेखन कलेचा उपयोग झाला. कारण इतरांच्या तुलनेत माझ्या संगणकाचा कळफलक जास्त चांगला आणि सुलेखनासाठी उपयुक्त असलेला होता. मी तेव्हा जे शिकलो, ते हे असं उपयोगी आलं. मग जाणवलं, बरंच झालं आपलं महाविद्यालय सुटलं ते. मी असा त्या वेळी बाहेर पडलो नसतो, तर हे काही जमलंच नसतं. दुसरी गोष्ट माझ्या उद्योगाची. मी आणि वॉझ यांनी माझ्या वडिलांच्या गॅरेजमध्ये पहिला संगणक तयार केला. बरीच खटपट करावी लागली. चांगलं फळ आलं त्याला. तेव्हा आम्ही नाव दिलं आमच्या संगणकाचं अ‍ॅपल. हे जमलं तेव्हा मी जेमतेम २० वर्षांचा होतो. मग आम्ही दोघांनी कंपनीच काढली.


पुढच्या १० वर्षांत आम्हा दोघांच्या कंपनीत चार हजारजण नोकरीत होते आणि अ‍ॅपलचा आकार २०० कोटी डॉलर्सचा झाला होता. आमचा पहिला मोठा संगणक जन्माला आला होता. मॅकिंतोश. मी तेव्हा तिशीत होतो. तिथे दुसरा धक्का बसला. मला माझ्या भागीदारानं कंपनीतून काढूनच टाकलं. मला प्रश्न पडला. मीच जी कंपनी जन्माला घातली, तिथून मलाच कसं काय हे लोक बाहेर काढतात. पण तसं झालं होतं खरं. तेव्हा मी ठरवलं, या प्रश्नाच्या उत्तरात रक्त आटवायचं नाही. नवं करूया काहीतरी. खरं तर समोर अंधार होता. पण म्हटलं हरकत नाही. जमेलच आपल्याला काही ना काही. तशी खात्री होती. कारण माझं माझ्यावर प्रेम होतं. शांत बसलो. स्वत:लाच विचारलं. झालं ते झालं. आपल्याला आता काय करायला आवडेल. माझं पहिलं प्रेम होतं ते अर्थातच अ‍ॅपल. दुसरं काय? तर तेही अ‍ॅपलच. मग दुसरी संगणक कंपनी काढायची मी ठरवलं. तिला नाव दिलं नेक्स्ट. पाठोपाठ दुसरा उद्योग सुरू केला पिक्सर नावानं. जगातली पहिली अ‍ॅनिमेशन फिल्म मी केली. तिचं नाव टॉय स्टोरी. आजही तिची लोकप्रियता कमी झालेली नाही. याच काळात माझ्या कंपनीचा विस्तार इतका झाला की अ‍ॅपलला पुन्हा मोह झाला या कंपन्या घेण्याचा. कारण मी विकसित केलेलं तंत्रज्ञानच तसं होतं. शेवटी अ‍ॅपलनं या कंपन्या विकत घेतल्या. मी आपोआपच पुन्हा अ‍ॅपलमध्ये आलो. अ‍ॅपलचा सध्याचा जो काही विस्तार सुरू आहे तो मी नेक्स्ट आणि पिक्सरमध्ये जे काही केलं, त्याच्या जोरावर. इथंच मला माझी जीवनसाथी मिळाली. लॉरीन आणि माझा संसार उत्तम सुरू आहे. मागे वळून बघितल्यावर आता मला वाटतं, अ‍ॅपलनी मला हाकललं नसतं तर नेक्स्ट आणि पिक्सर जन्माला आल्या असत्या का? आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे मला लॉरीन मिळाली असती का?

माझी तिसरी गोष्ट मरणाविषयीची आहे. सतराव्या वर्षी मी कुठेतरी वाचलं होतं, ‘‘आपण प्रत्येक उगवणारा दिवस हा आपला जणू शेवटचाच दिवस आहे असं जगायला लागलो तर एखादा दिवस असा उजाडतो की त्या सगळय़ा जगण्याचा अर्थ कळतो.’’ हे वाक्य माझ्या डोक्यात सतत गुंजत असतं. मरणाचं भान सतत असलं मनात तर आपण वेळ वाया घालवत नाही. यशापयश, मानापमान वगैरे सर्व भौतिक भावना मरणात संपून जातात. आपण काहीतरी गमावणार आहोत ही भावना मृत्यूच्या जाणिवेने आपल्याला नग्न करत असते. याचं भान आलं की एकच प्रश्न त्यावर पुरून उरतो. आपण जो काही वेळ आपल्याला मिळाला.. त्याचं काय केलं? तो सत्कारणी लावला का? हा प्रश्न माझ्या डोक्यातून कधी जात नाही. गेल्या वर्षी कर्करोग झाल्याचं निदान झालं. ते कळल्यावर डॉक्टरांनाच वाईट वाटलं. कारण हा अगदी दुर्मीळ असा कर्करोग आहे. स्वादुपिंडाचा. डॉक्टर म्हणाले, तयारीला लागा.. शेवटच्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण करून घ्या.. जेमतेम तीन महिने तुम्हाला मिळतील.

मी घरी गेलो. दोन दिवसांनी माझी बायोप्सी करायची होती. त्यासाठी मला डॉक्टरांनी भूल दिली. घशातून एंडोस्कोप पोटात सोडला अणि माझ्या स्वादुपिंडाच्या काही पेशी घेऊन तो बाहेर आला. मी बेशुद्धच होतो. पण लॉरीन ते सगळं पडद्यावर बघत होती. ती म्हणाली, एंडोस्कोप बाहेर आल्यावर डॉक्टरच रडायला लागले. कारण त्यांना लक्षात आलं, परिस्थिती काही इतकी वाईट नाही. शस्त्रक्रिया केली तर मी वाचू शकेन. तशी ती शस्त्रक्रिया झाली आणि मी वाचलोदेखील. मृत्यूच्या या स्पर्शानं मला बरंच काही शिकवलं. मरणाइतकं काहीही शाश्वत नाही. आपल्याला वेळ कमी असतो आणि तरीही त्यातला मोठा वाटा आपण वायाच घालवतो. तेव्हा विद्यार्थी मित्रांनो
, मला सांगायचंय ते इतकंच की.. इतरांची मतं, त्यांचे जगण्याचे निष्कर्ष, मार्गदर्शन या गोंडसनावाने त्यांच्याकडून लादली जाणारी मतं.. याचा कसलाही विचार करू नका.. इतरांच्या मतांचं ओझं कधीही वागवू नका.. जे काही जगायचंय ते स्वत:च आयुष्य जगा. तुम्हाला आयुष्यात काय आवडतं ते तुमच्या मनाला माहीत असतं.. त्याचं तेवढं लक्ष देऊन ऐका. बाकीचं सगळंच दुय्यम असतं. धन्यवाद.

No of Unique Visitors
Water Resources  Civil Engineering Notes  Aamhi Sangamnerkar  Books
© 2011 Pravin Kolhe
 
Page Last Updated on 28-12-2011 21:01:38